डोंबिवली | १६ ऑगस्ट
छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याला वाव देण्याची संधी मिळाली असून स्थानिक पातळीवर क्रीडा क्षेत्राची मजबूत पायाभरणी करण्यासाठी मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याची पोचपावती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचा५१ वा वर्धापन दिन सोहळा तसेच खेळाडूंच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या वेदर शेडचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. (Weather Shed for Athletes at Dombivli’s Nehru Maidan; Inaugurated in the Presence of BJP State President Ravindra Chavan)
छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने गेल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. डोंबिवलीतील क्रीडा संस्कृतीला बळ देतानाच अनेक होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंडळ सातत्याने करत असल्याचेही भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, नेहरू मैदानावर उभारण्यात आलेले वेदर शेड हे खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पाऊस, कडक ऊन किंवा प्रतिकूल हवामानात खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या शेडमुळे मैदानावर सराव करणाऱ्या खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे. डोंबिवलीतील क्रीडा क्षेत्राला अधिक चालना देण्यासोबतच खेळाडूंना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या कार्यक्रमास भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर राहुल दामले, भाजपा गटनेते तथा नगरसेवक शशिकांत कांबळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक नंदू म्हात्रे, नगरसेवक मंदार टावरे, नगरसेवक साई शेलार, नगरसेविका खुशबूताई चौधरी, नगरसेविका शारदाताई चौधरी, नगरसेविका रंजनाताई पेणकर, नगरसेविका रविनाताई म्हात्रे, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष पवन पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र भोईर, उपाध्यक्ष सुरेश देवाडीकर, उपाध्यक्ष रविंद्र कडव, उपाध्यक्ष शुभांगीताई कदम आणि खजिनदार निलेश सावंत उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना आगामी काळातही डोंबिवलीतील खेळाडूंना अधिकाधिक सुविधा आणि प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

