उल्हास नदी बचाव कृती समितीची कर्जत परिसरात पाहणी; पाण्याचे नमुने आणि गाळाची वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी
कर्जत | ३० सप्टेंबर :
गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीचे पाणी अचानक लालसर आणि मोठ्या प्रमाणात गढूळ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. या लालसर पाण्याचा नेमका स्रोत शोधण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समिती आणि हुतात्मा दिलीप कपोते फाउंडेशनच्या वतीने उल्हास नदीच्या वरच्या प्रवाहापासून विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. (Why Has the Ulhas River Turned Red? Is Hill Cutting, Tree Felling and Silt Flow Along the Chilhar River Affecting the Ulhas?)
पाहणीदरम्यान डोंगरकटिंग, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, मातीचे विस्थापन, नदीकाठावरील बांधकामे आणि नदीत वाहून येणारा गाळ आढळून आला. विशेषतः कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुमारे १८० एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगरकटिंग आणि वृक्षतोड झाल्याचे पाहणीत निदर्शनास आल्याचे समितीने म्हटले आहे.
या भागातील डोंगराचा नैसर्गिक उतार बदलल्याने काही ठिकाणी माती घसरणे आणि भूस्खलनासारखी परिस्थिती दिसून आली. मुसळधार पावसात ही लालसर माती व गाळ चिल्हार नदीत आणि पुढे उल्हास नदीत वाहून येत आहे का, हा आता तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.
विशेष म्हणजे चिल्हार नदीच्या पाण्यासोबत नदीतील दगड आणि खडकांवरही लालसर थर आढळल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे हा नैसर्गिक गाळाचा परिणाम आहे की अन्य कारणामुळे पाण्याचा रंग बदलला आहे, याची वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे.
दरम्यान, कोंदाणे लेणी परिसर, पेज नदीकाठ, टॉरंट पॉवर प्लांट परिसर, सावरगाव रेल्वे यार्ड तसेच वावे, वांजळे, बेंडसे, दहीवली, आवळस, नेवाळी, कोल्हारे, धामोते, शेलू, बांधिवली आणि खारवडी आदी भागांचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी सुरू असलेल्या विविध बांधकामांमधून माती अथवा गाळ नदीत मिसळतो आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वैज्ञानिक तपासणीची मागणी
आतापर्यंतच्या पाहणीत पिंपळोळी परिसरातील डोंगरकटिंग आणि मातीचे विस्थापन हे लालसर गाळाच्या संभाव्य स्रोतांपैकी एक असल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, वैज्ञानिक जलनमुना तपासणीशिवाय कोणत्याही एका प्रकल्पाला दोषी ठरविणे योग्य नसल्याचेही समितीने स्पष्ट केले. चिल्हार, उल्हास आणि पेज नदीच्या विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तुलनात्मक तपासणी करावी. तसेच नदीतील लालसर गाळ, नदीकाठची माती आणि उत्खननातील माती यांचेही वैज्ञानिक परीक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
MPCB, महसूल, वन, जलसंपदा विभाग, स्थानिक प्रशासन तसेच संबंधित प्रकल्प आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त पाहणी करून डोंगरकटिंग, वृक्षतोड, नदीकाठावरील बांधकामे आणि माती व्यवस्थापनासंदर्भातील परवानग्यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“उल्हास नदी लाल का झाली? स्रोत शोधल्याशिवाय प्रश्न संपणार नाही आणि वैज्ञानिक पुरावा समोर येईपर्यंत शोध थांबणार नाही,” अशी भूमिका उल्हास नदी बचाव कृती समितीने घेतली आहे.
हा पाहणी दौरा हुतात्मा दिलीप कपोते फाउंडेशनच्या डॉ. कल्पना (राणी) कपोते यांच्या पुढाकाराने शशिकांत दायमा यांच्या सहकार्याने झाला. यावेळी रविंद्र लिंगायत, अशफाक शेख, प्रशांत राऊत, हरेश सोनावळे, मोहन भागवत, सचिन तसेच उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

