दिनार पाठक : ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक
१३ एप्रिल रोजी रायते पुलावर भीषण अपघात झाला. त्यात अनेकांचा बळी गेला. या अपघाताची चर्चा झाली आणि आपण सगळेच हळहळलो. पण, या अपघाताने आपले डोळे उघडायला हवे. चर्चा खूप केली आणि पुन्हा जैसे थे, असं व्हायला नको. आपण या अपघातातून काही शिकणार आहोत का? (Will We Learn Anything from the Rayate Bridge Accident?… Senior Journalist and Analyst Dinar Pathak Presents the Ground Reality from a Technical and Scientific Perspective)
अपघाताची कारणं तपासांती समजतील. पण, आपण थोडंसं विज्ञान समजून घेऊया.
– अपघात झाला ती गाडी होती मारुती सुझुकी ईको. गाडीची क्षमता ५ किंवा ८ प्रवाशांची.
– प्रत्यक्षात गाडीत ११ जण होते.
आता क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ११ जण गाडीतून जात असतील, तर त्याचे काय काय परिणाम होतील, ते पाहू. अपघात झाला, तेव्हा गाडीचा वेग किती होता, हे आत्ता तरी नेमकं माहिती नाही. पण, धडक इतकी जोरदार होती की, धडकेनंतर ही ईको ३६० अंशात फिरली, हे वृत्तपत्रांतल्या फोटोंतून दिसतंय. गाडीची मागची बाजू सिमेंट मिक्सरसमोर दिसतेय.
– क्षमतेपेक्षा जास्त वजन किंवा प्रवासी भरल्यावर वळण घेताना दोन गोष्टी होतात. पहिली म्हणजे ‘Drag’ (ओढल्यासारखं वाटणं) आणि ‘Roll’ (गाडी एका बाजूला कलणे).
– ईको गाडीची उंची अन्य गाड्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती कलण्याची शक्यता वाढते.
ईको ही गाडी मुळात उंच आणि अरुंद आहे, त्यामुळे ११ जणांच्या वजनासह ती चालवणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं, हे अपघातातून स्पष्ट झालंच आहे. त्यातच या गाडीला बॉनेट, त्यात इंजिन अशी रचना नाही. त्यामुळे समोरून धडक बसल्यावर त्याचा केबिनवर थेट आघात होतो.
आता ओढल्यासारखं वाटणं आणि गाडी एका बाजूला कलणं, हे समजून घेऊ.
१. ‘Roll’ म्हणजे गाडी एका बाजूला कलणं म्हणजे काय?
– ईकोमध्ये ११ लोक बसल्यामुळे गाडीचं गुरुत्वमध्य केंद्र (Center of Gravity) खूप वर जातं.
– जेव्हा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेली धावती गाडी वळवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ‘Centrifugal Force’ मुळे (केंद्रापसारक शक्ती) गाडी वळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या विरुद्ध दिशेला जोरदार झुकते किंवा ओढली जाते.
– गाडीत ११ प्रवासी असतील, तर त्यांच्या वजनामुळे हे झुकणं (Body Roll) इतकं जास्त असेल की, एक तर गाडी उलटेल किंवा नियंत्रणाबाहेर जाईल.
– या अतिरिक्त वजनामुळे सस्पेन्शनवरही ताण येतो. गाडी वळवताना पूर्ण वजन एका बाजूला जाऊन सस्पेन्शनच्या स्प्रिंग्स दबतात. त्यातूनही गाडीचा समतोल जातो.
२. आता ‘Drag’ म्हणजे ओढल्यासारखं किंवा जड वाटणं समजून घेऊ.
भरधाव वेगात गाडी वळवण्याचा प्रयत्न करताना स्टिअरिंगवर परिणाम होतो. ईको गाडीत ११ जण असतील, तर गाडीचा मागचा भाग खाली दबतो. मग पुढची बाजू आणि चाकं थोडी ‘हलकी’ होतात. अशा परिस्थितीत वळण घेताना स्टिअरिंग जास्तच मोकळं – ‘फ्री’ किंवा बधीर झाल्यागत वाटू लागतं. त्यामुळे गाडी वळवण्याचा प्रयत्न केला तरी ती सरळ जाण्याचा प्रयत्न करते. याला Understeer असं म्हणतात. त्यामुळेच गाडी ओढल्यासारखी (Drag) वाटते.
दुसरं म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास इंजिनवरही ताण येतो. ११ प्रवाशांचं ७००-८०० किलो आणि गाडीचं स्वतःचं वजन… ईकोच्या १.२ लीटर इंजिनावर त्यामुळे प्रचंड ताण पडतो. त्यामुळे गाडीच्या पिक-अपवरही परिणाम होतो.
– थोडक्यात ११ प्रवाशांना घेऊन जाणारी ईको अपघाताला आमंत्रण ठरते. कारण वेगात वळण घेताना गाडीचे ब्रेक-टायर निकामी होण्याचीही भीती असते.
नेमकं काय घडलं, ते CCTV फूटेज मिळाल्यास स्पष्ट होईल. पण, ही ईको गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रणाबाहेर गेली, ड्रॅग आणि रोलमुळे ओव्हरटेक झाल्यावरही पुन्हा डावीकडे जाऊच शकली नाही, अशीही शक्यता आहे. त्यामुळे ती समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरला थेट धडकली असावी. अर्थात ही शक्यताच आहे. पोलिस तपासातून, विज्ञानाच्या मदतीनं खरं आणि नेमकं कारण स्पष्ट होईलच.
आपण काय करायला हवं?
१ – प्रवासीक्षमता पूर्ण झालेल्या वाहनात बसायला नकार द्यावा. मग ती रिक्षा असो, ईकोसारखी वाहनं किंवा बस… काम कितीही महत्त्वाचं असलं, तरीही. कारण, दुर्दैवानं अपघात झाला, तर कितीही अर्जंट काम असलं, तरी ते होत नाहीच.
२ – हाच नियम आपल्या स्वतःच्या वाहनांसाठीही लागू करावा. थोड्या अंतरासाठी बसलो पाचऐवजी सात-आठ जण कारमध्ये, दुचाकीवरून गेलो दोनऐवजी तिघे-चौघे… नाही. वेळ सांगून येत नाही. (असे प्रकार आपणही कधी केले असतील, करत असू तर ते ताबडतोब बंद करायला हवे.) नियम आपल्या भल्यासाठी आणि संभाव्य धोक्यांचा अभ्यास करूनच तयार केले जातात. त्यांचा आदर करायलाच हवा. तेच आपल्या भल्याचं आहे.
३ – आपल्या गाडीला नियमांत न बसणाऱ्या कुठल्याही गोष्टी (ॲक्सेसरीज) उदा. समोरच्या काचेवर डार्क फिल्म, प्रखर प्रकाशाचे दिवे लावू, दुचाकीला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणं, चित्रविचित्र दिवे, वाहनाच्या आकारमानापेक्षा जास्त लांबी किंवा रुंदीचं सामान नेणं इत्यादी कुठल्याही परिस्थितीत करू नये.
४ – वेगाचं भान राखायला हवंच. आपण कितीही चांगले ड्रायव्हर असलो, तरी समोरच्याची चूक आपल्याला संकटात लोटू शकते. त्यामुळे आपला वेग मर्यादेबाहेर कधीही नसावा.
थोडक्यात, आपण सुरक्षित राहणं हा आपला अधिकार आहेच, पण त्याहूनही जास्त म्हणजे आपल्यासह इतरांची सुरक्षितता… आपली जबाबदारीही आहे!!!

