Home ठळक बातम्या ‘क्या हुआ तेरा वादा? कब आएंगे ये पैसे’; साडेसहा हजार कोटींच्या घोषणेवरून...

‘क्या हुआ तेरा वादा? कब आएंगे ये पैसे’; साडेसहा हजार कोटींच्या घोषणेवरून माजी महापौरांचा भाजपवर हल्लाबोल तर भाजपचाही सेनेवर पलटवार

#Kdmc1 #LNN

कल्याण दि.26 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक काळात डोंबिवलीतील विकास परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या घोषणेला नुकतीच 3 वर्षे पूर्ण झाली असून ‘क्या हुआ तेरा वादा ? कब आएंगे ये पैसे? असा सवाल उपस्थित करीत माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी भाजपवर टिका केली आहे. तर भाजपनेही याला उत्तर देताना महापौरपदाच्या अपयशी कारकिर्दीच्या निराशेतून देवळेकर यांनी हे आरोप केल्याचा पलटवार भाजप गटनेते वरूण पाटील यांनी केला आहे.

11 ऑक्टोबर 2015 रोजी डोंबिवलीत झालेल्या विकास परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी 6 हजार 500 कोटींची घोषणा केली. हे पॅकेज घोषित केल्यानंतर महापौर म्हणून आपण तब्बल 16 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना पत्रही दिली. परंतु त्याची कुठलीही रक्कम शासनाने आम्हाला दिली नसल्याचे देवळेकर यांनी सांगितले. एकदा तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीकरांकरिता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतरही त्यांनी एकही पैसा देण्याचे सौजन्य दाखवलं नसल्याचा घणाघातही देवळेकर यांनी केला. तसेच उलटपक्षी आम्हाला देय असलेले हद्दवाढ अनुदान, ग्रामीण भागातील तुटीचे एलबीटी अनुदान हेदेखील राज्य शासनाने आम्हाला दिलं नाही. आम्हाला मिळणाऱ्या अनुदानात कपात करीत या सगळ्या घोषणांवर त्यांनी पाणी फिरवलं आहे. कल्याण डोंबिवलीकरांवर वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय या अडीच तीन वर्षांच्या कालावधीत शासनाने केल्याचे सांगत आज कल्याण डोंबिवलीकर मुख्यमंत्र्यांना ‘क्या हुआ तेरा वादा? कब आयेंगे ये पैसे ? हा सवाल विचारत असल्याचेही देवळेकर म्हणाले.

तर त्यावर प्रतिक्रिया देताना अडीच वर्षे महापौरपदी राहून कोणताही प्रभाव न पाडू शकल्याने अपयशी महापौर अशी प्रतिमा झाल्याच्या निराशेतून माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केल्याचा पलटवार भाजप गटनेते वरूण पाटील यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करुन दाखवतात.६ हजार ५०० कोटींचे पँकेजची घोषणा केल्याप्रमाणे एमएमआरडीएच्या माध्यमातुन कल्याण डोंबिवलीसाठी खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीसाठी मेट्रो मंजुर करुन १५ हजार कोटींपेक्षा जास्तच्या निधीला मुख्यमंत्रीसाहेबांनी मंजुरी दिल्याचे वरूण पाटील यांनी म्हणाले.

कल्याण डोंबिवली रिंगरुट- ५०० कोटी
कल्याण दुर्गाडी ब्रिज – ७५ कोटी
मोठा गाव मानकोली – १८० कोटी
ग्रोथ सेटंर साठी- १००० कोटी
डंपिंग ग्राउंड क्लोजर – ११४ कोटी
अमृत योजनेअंतर्गत – १८५ कोट
सीसीटीव्ही – ५५ कोटी
स्मार्ट सिटी योजनेतुन – ३५० कोटी

दरम्यान 6 हजार 500 कोटींच्या घोषणेवरून 3 वर्षांपूर्वी सुरू झालेला ‘सवाल जवाब’चा हा सिलसिला आगामी निवडणुकीच्या काळातही असाच रंगणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*