Site icon LNN

नव्या भारताचे तुम्हीच अँबेसेडर; योग्य करिअर निवडून देशाच्या विकासात योगदान द्या” — आयुक्त अभिनव गोयल यांचे शालेय विद्यार्थ्यांना आवाहन

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत डॉन बॉस्को स्कूलमध्ये करिअर समुपदेशन सत्र

कल्याण| २७ सप्टेंबर:

“आजची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही नव्या भारताचे खऱ्या अर्थाने अँबेसेडर आणि देशाचे भविष्य आहात. मात्र तुमच्यातील क्षमतेला योग्य दिशा मिळाली नाही तर ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे आपली आवड, क्षमता आणि उपलब्ध संधी यांचा विचार करून योग्य करिअरची निवड करा,” असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज विद्यार्थ्यांना केले.

महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता तथा उपक्रम समन्वयक प्रशांत भागवत आणि डॉन बॉस्को शाळेच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियानाअंतर्गत डॉन बॉस्को शाळेमध्ये ‘करिअर समुपदेशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयुक्त गोयल म्हणाले की, “शाळेत येणे मला नेहमीच आवडते. शाळेत आल्यानंतर माझे लहानपण आणि आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याची आठवण होते. करिअर समुपदेशन ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. आज जगभरात पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक करिअरच्या चौकटीत न राहता बदलत्या काळातील संधींचाही विचार करणे आवश्यक आहे.”

आजची पिढी innovative, active, creative आणि vocal असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेला योग्य दिशा देण्याची गरज व्यक्त केली. “करिअर निवडताना माझी आवड काय आहे, माझी क्षमता काय आहे आणि उपलब्ध संधी कोणत्या आहेत, यांचा समतोल विचार करणे महत्त्वाचे आहे,” असेही आयुक्त गोयल यांनी स्पष्ट केले.


“विद्यार्थ्यांनी देश, राज्य आणि शहरासाठी योगदान देण्याचे ध्येय ठेवावे” — सभागृह नेते वरुण पाटील
देश, राज्य आणि आपल्या शहरासाठी काहीतरी चांगले करण्याचे ध्येय ठेवावे असे आवाहन महापालिकेचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअरची दिशा निश्चित करताना समाजाप्रती असलेली जबाबदारीही लक्षात ठेवावी, योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यात समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असा विश्वासही वरुण पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

“लाईफमध्ये चॅलेंज स्वीकारा” – वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर
कार्यक्रमातील विशेष मार्गदर्शक आणि केंद्रीय वस्तू तथा सेवा कर विभागातील वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांमधील विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “लाईफमध्ये चॅलेंज स्वीकारा,” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी ध्येये निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

रेडकर यांनी सांगितले की, आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या आवडी-क्षमता समजून घेत त्यांच्या करिअरचा योग्य मार्ग निवडण्यासाठी पालकांनी सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे. रेडकर यांच्या ४२८व्या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, नागरी सेवा परीक्षा, IAS, IPS, IRS, NDA, CDS यांसह केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील पदे, राज्य सरकारमधील प्रशासकीय सेवा, बँकिंग क्षेत्र तसेच इतर शासकीय सेवांमधील करिअरच्या संधींची माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रीय आस्थापनांमध्ये तुलनेने कमी प्रमाणात दिसत असल्याची खंत व्यक्त करत रेडकर यांनी महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवांसह इतर विभागांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शनाचा उपक्रम
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध पर्यायांची माहिती देणे आणि योग्य क्षेत्र निवडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा होता. येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीतील विविध शाळा – महाविद्यालयांमध्ये त्याचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक प्रशांत भागवत यांनी दिली.

यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, नगरसेवक जयवंत भोईर, अतिरिक्त शहर अभियंता तथा कार्यक्रम समन्वयक प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, महापालिकेचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण देशपांडे, महेंद्र वाकपैंजण तसेच डॉन बॉस्को शाळेचे डॉमिनिक सर यांच्यासह शिक्षक, आणि दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version