Site icon LNN

केडीएमसी शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत ‘युथ फॉर एज्युकेशन’चा सर्वेक्षण अहवाल महापौरांना सादर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह पाणी, स्वच्छता, जीर्ण इमारतींच्या संरचनात्मक तपासणीची मागणी

कल्याण-डोंबिवली |८ सप्टेंबर:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी ‘युथ फॉर एज्युकेशन’ आणि सीजेपीच्या वतीने करण्यात आलेल्या शाळा सर्वेक्षणाचा अहवाल महापौर ॲड हर्षाली थविल-चौधरी यांच्याकडे सादर करण्यात आला. संस्थेच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या समस्या आणि आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.(Youth for Education’ Submits Survey Report on KDMC School Infrastructure to Mayor; Calls for Student Safety, Clean Water, Better Sanitation and Structural Audit of Dilapidated Buildings)

या सर्वेक्षणात महापालिका हद्दीतील क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालय, आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालय, उस्ताद बंदे अली खान उर्दू माध्यम शाळा, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय आणि सोनुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालय या पाच शाळांचा समावेश करण्यात आला होता. पाहणीदरम्यान शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता तसेच जुन्या इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता यासंदर्भात विविध बाबी समोर आल्या.

विशेषतः आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविणे आणि सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करणे, शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करून गाळ काढणे, प्रत्येक शाळेसाठी नियमित व स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देणे, तसेच जुन्या आणि जीर्ण इमारतींची संरचनात्मक तपासणी करून घेण्याच्या मागण्या ॲड. अक्षय पाठक यांनी महापौरांसमोर मांडल्या.

सर्वेक्षणातील निष्कर्षांची महापौर हर्षाली चौधरी यांनी गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित महापालिका विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन दिले. यामध्ये शाळांजवळील वाहतूक सुरक्षितता, पाण्याच्या टाक्यांची पाहणी – स्वच्छता आणि शाळांमधील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

दरम्यान या मागण्यांबाबत महापालिका आयुक्त कार्यालयाकडेही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढील काळात सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. आकाश वेदक यांनी दिली.

या भेटीदरम्यान ‘युथ फॉर एज्युकेशन’तर्फे शुभम शिंदे, ओंकार जाधव, गायत्री गावंडे, मिली साहो, विपुल इंगोले, प्रज्वल वरडकर आणि सिद्धेश बाविसकर उपस्थित होते.

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांना दर्जेदार आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी ‘युथ फॉर एज्युकेशन’ सकारात्मक आणि रचनात्मक पद्धतीने सातत्याने काम करत राहणार असल्याचे पूजा मीठभावकार यांनी सांगितले.‘विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षणाची गुणवत्ता हीच प्राथमिकता’अशी भूमिका संस्थेने यावेळी स्पष्ट केली.

Exit mobile version