
दरवर्षी येतेय तब्बल 85 कोटींहून अधिक वीज बिल
कल्याण डोंबिवली दि.20 मे :
नियुक्ती झाल्यापासूनच केडीएमसीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये असलेल्या आयुक्त अभिनव गोयल यांनी आपला मोर्चा आता अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या वीज वापराकडे वळवला आहे. दर वर्षागणिक वीज बिलावरील वाढत चाललेला कोट्यवधींचा खर्च पाहता महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनावश्यक वापर टाळून काटकसरीने वीज वापरण्याचे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे. यासंदर्भात केडीएमसी विद्युत विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आले असून त्याद्वारे हे आवाहन करण्यात आले आहे. (Electricity bill costs crores; Electricity Department appeals to municipal officials and employees to use electricity sparingly)
आजच्या घडीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वीज वापर आणि वीज बिलाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या वीज बचतीचे अधिक महत्त्व पटून येईल. आजमितीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विभागांचा वीजवापर पाहता दरवर्षी तब्बल 85 कोटींहून अधिक वीज बिल येत आहे. ज्यामध्ये नागरिकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विभाग असलेल्या पाणी पुरवठा खात्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे 60 कोटींच्या घरात आहे. त्यानंतर शहरातील पथदिवे 15 कोटी 47 लाख, जलनिसारण – मलनिसारण 6 कोटी 88 लाख, कार्यालयीन 1 कोटी 88 लाख, नाट्यगृह 1 कोटी 67 लाख, रुग्णालये 1 कोटी 65 लाख, घनकचरा व्यवस्थापन 91 लाख अशी त्याची वर्गवारी आहे.
महापालिका प्रशासकीय इमारत, महापालिका भवन, महापालिका रुग्णालये, प्रभागक्षेत्र कार्यालये, नाट्यगृह या सर्व महापालिका इमारतीमध्ये महापालिका अधिकारी यांच्यासाठी वातानुकुलीन व्यवस्था, लाईट व्यवस्था तसेच महापालिका कर्मचारी यांचेसाठी लाईट व्यवस्था, फॅन व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहता त्यांचा वापरही तितक्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी केडीएमसीला कोटींच्या घरामध्ये महावितरण कंपनीला वीजेचे बील अदा करावे लागत आहे. मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन वीज वापराच्या पद्धतीमध्ये छोटे छोटे बदल केले तरी विजेसोबतच महापालिकेच्या निधीची मोठी बचत होऊ शकते अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या संकल्पनेवर आधारीत कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी वातानुकुलीत यंत्रे, लाईट, फॅन याचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकता नसताना कार्यालयातील, सार्वजनिक ठिकाणी असलेली वातानुकुलीत यंत्रे, लाईट, फॅन हे बंद करण्याची शिस्त स्विकारल्यास वीजेची बचत होऊन वीज बीलावरील खर्चही कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
त्याअनुषंगाने महापालिका अधिकाऱ्यांनी पुढील गोष्टींचा अवलंब करण्यासह आपल्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांचेही विज बचतीबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
दालन किंवा बैठकीच्या ठिकाणी कॉन्फरन्स रुममधील वातानुकुलीत यंत्र २६ डीग्री सेल्सीयसवर सेट करण्यात यावीत.
दालन सोडतांना किंवा दालनात नसतांना वातानुकुलीत यंत्रे, लाईट, फॅन तात्काळ बंद करणेबाबत शिपाई यांना आदेश देण्यात यावेत.
आपल्या अधिनस्त कर्मचारी यांनीही त्यांचे आसन सोडतांना त्यासाठी लावण्यात आलेला लाईट, फॅन बंद करणेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.
तर महापालिका रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांनीही आवश्यकतेनुसार वीजेचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यावेत.
नाट्यगृहामधील वातानुकुलन यंत्रणा ही मध्यवर्ती स्वरुपाची असल्याने त्यासाठी वीजेचा मोठा वापर होतो. त्यामुळे नाट्यगृह व्यवस्थापकांनी नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी २० मिनीट आधी वातानुकुलीत यंत्रणा सुरु करावी. तसेच नाट्यगृहातील लाईट, फॅन याचा वापरही आवश्यकतेनुसार करण्याचे नियोजन व्यवस्थापकांनी करावे.
तर १ युनिटची वीजबचत म्हणजे २ युनीटची निर्मिती असल्याने महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी वीजेचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केली आहे.