
डोंबिवली दि.23 ऑगस्ट :
डोंबिवलीसह आसपासच्या शहरांसाठी नाट्यचळवळीचे केंद्र असलेले कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार आहे. काही दिवसांपूर्वी अंतर्गत भागात झालेल्या पडझडीनंतर याच्या विकासासाठी निधीची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने या नाट्यगृहासाठी ३५ कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील १५ कोटी रूपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. नुकताच या निधीचा शासन निर्णय शासनाने जाहीर केला. त्यामुळे नव्या रूपातले नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (35 crores fund for the development of Savitribai Phule Theatre, 15 crores fund to the municipality – Kha. Dr. Shrikant Shinde’s follow-up is successful)
सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरात नाट्य, कला क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी असते. डोंबिवली हे कला आणि नाट्य रसिकांची पंढरी म्हणूनही ओळखली जाते. डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील नाट्यरसिकांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे सावित्रीबाई ज्योतीराव फुले नाट्यगृह हे हक्काचे ठिकाण आहे. मात्र काही दिवसांपूर्वी येथील नाट्यगृहात प्रेक्षाकांच्या खुर्च्यांवरचा काही भाग पडला होता. रात्रीच्या सुमारास हा प्रकार झाला होता. त्यामुळे कुणालाही इजा झाली नव्हती. त्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने हे नाट्यगृह दुरूस्तीसाठी बंद केले होते. नाट्यगृह बंद झाल्याने नाट्य, कला रसिकांचा हिरमोड झाला होता.
देखभाल दुरूस्तीसाठई बंद केलेले नाट्यगृह आता नव्या स्वरूपात विकसीत केले जावे अशी मागणी या दरम्यान नाट्य रसिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर कल्याण डोंबिवी महापालिका प्रशासनाशी संवाद साधत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत आवश्यक निधीची माहिती घेतली. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकतेच नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला.
त्यानुसार सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या विकासासाठी नगरविकास विभागाने ३५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर त्यात पहिल्या टप्प्यात १५ कोटी रूपयांचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्या माध्यमातून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे रूप पालटले जाणार आहे. त्यामुळे लवकरच हे नाट्यगृह नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत डोंबिवलीतील नाट्यरसिक आणि कलाकारांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
तर या कलावंतांची पंढरी असलेल्या डोंबिवलीतील नाट्यगृहाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचेे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.