Home ठळक बातम्या डोंबिवलीतील काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये; पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाणार –...

डोंबिवलीतील काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये; पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाणार – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

तर पक्षप्रवेशाने काँग्रेसमध्ये पडली अंतर्गत वादाची ठिणगी

डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
डोंबिवलीतील काँग्रेसच्या चार माजी ज्येष्ठ नगरसेवकांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केल असून पक्षाकडून त्यांचा नेहमीच सन्मान केला जाईल अशी ग्वाही यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील काँग्रस पक्षाला खिंडार पडले आहे. माजी नगरसेवक जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे, हदयनाथ भोईर, माजी नगरसेविका हर्षदा हदयनाथ भोईर, टिटवाळ्याचे माजी नगरसेवक बुधाराम सरनोबत, शैलेंद्र भोईर, सदानंद म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे उपस्थित होते. (4 Congress corporators from Dombivli join BJP; They will always be respected by the party – State President Ravindra Chavan assures),

डोंबिवलीतील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून या माजी नगरसेवकांची ओळख आहे. तसेच हदयनाथ भोईर, हर्षदा भोईर हे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुदाम भोईर, माजी उपमहापौर दि. पंडित भोईर यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या निष्ठावान काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने डोंबिवलीत काँग्रेसला खिंडार पडले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

‘भाजपमध्ये दाखल झालेल्या या नगरसेवकांशी आपले जुने कौटुंबिक संबंध आहेत. विकासासाठी काँग्रेसचे असुनही त्यांनी कल्याण डोंबिवलीतील सर्व विकास कामांच्या विषयावर पालिकेतील ठरावांना नेहमीच पाठिंबा दिला. त्यामुळे निरपेक्ष भावनेतून काम करणाऱ्या या नगरसेवकांचा भाजपमध्ये नेहमीच सन्मान केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

‘काँग्रेस म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे काँग्रेस असेच डोंबिवलीतील चित्र होते. मागील काही वर्षाचा विचार केला तर प्रभागातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी, लोकांची कामे करण्यासाठी पक्ष बदल आवश्यक वाटू लागला होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. यापूर्वी आम्ही काँग्रेसमध्ये होतो तरी आम्हाला विकास कामांसाठी सर्वाधिक निधी देण्याचे काम यापूर्वीपासून भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी केले आहे,’ अशी प्रतिक्रिया यावेळी माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी व्यक्त केली.

तर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढविण्यासाठी मित्र पक्षाचा सन्मान राखून असे पक्ष प्रवेश ही काळाची गरज आहे, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. अतिशय निष्ठावान मंडळींनी भाजपमध्ये आज प्रवेश केला. त्यांचा अनुभव, त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाचा नक्कीच भाजपलाही लाभ होईल. या नगरसेवकांचे विकास, नागरी समस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नेहमीच तत्पर असेल, असे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या या दिग्गज नगरसेवकांच्या भाजपतील पक्ष प्रवेशामुळे तिकडे काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत कलह पेटला आहे. काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी संतोष केणे यांनी यासाठी केंद्रीय नेते संजय दत्त यांना जबाबदार धरले आहे. दत्त यांच्यामुळेच हे नगरसेवक पक्ष सोडून गेल्याचे सांगत केणे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. तर काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी संतोष केणे यांच्यावर प्रतिहल्ला करत पक्ष वाढीसाठी केणे यांचे काय योगदान आहे असा परखड सवाल विचारला आहे. तसेच केंद्रीय नेते संजय दत्त यांच्यावर टिका करण्याची केणे यांची पात्रता नसल्याचे सांगत पोटे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा