
कल्याण डोंबिवली दि.19.मे:
यंदा प्री-मान्सूनसदृश म्हणजेच वळवाच्या पावसाचे हवामान मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून दिसून येत आहे. आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही उन्हाचे नेहमीसारखे तीव्र चटके जाणवत नाहीयेत. याला कारण की नैऋत्य मान्सून एक आठवडा आधीच अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला असून या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या हवामान बदलामुळे पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता कोकण हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी व्यक्त केली आहे. (Monsoon arrives in Andaman a week early; Chance of rain with gusty winds in the next few days)
यावेळेचा मे महिना जरा वेगळाच आहे. एक जोरदार वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD), म्हणजे पश्चिमी विक्षोभ, नेहमीपेक्षा दक्षिणेकडे दूरपर्यंत, अगदी अरबी समुद्रापर्यंत पसरला होता. यामुळे फक्त पाऊसच आला नाही तर उत्तर आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर असणारी नेहमीची स्थिर हवामानाची प्रणालीही त्यामुळे बिघडली. साधारणपणे, ही उच्च दाबाची प्रणाली गुजरात आणि राजस्थानकडून महाराष्ट्राकडे गरम आणि वायव्येकडील वारे वाहवते. पण या जोरदार WD मुळे हे चित्र बदलल्याचे अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.
त्यातच, ह्या WD ने दक्षिणेकडून बाष्पयुक्त हवा (ओलावा खेचला) आणि नेहमीच्या LWD (दोन किंवा अधिक हवा प्रवाहांची एका विशिष्ट ठिकाणी एकत्र येणे) मुळे गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
निसर्ग आणि वातावरण बदलाची हीच मालिका पुढे सुरू असून नैऋत्य मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर साधारण वेळेपेक्षा एक आठवडा आधीच पोहोचला आहे. मान्सूनच्या या लवकर झालेल्या आगमनामुळे पूर्व-पश्चिम दिशेतील ‘शियर झोन’ (shear zone) अधिक सक्रीय झाला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात वरच्या थरातील हवेत चक्रीय सायक्लोनिक सर्क्युलेशन (UAC – Upper Air Cyclonic Circulation) तयार झालं असून ही शियर झोन आता पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्राच्या दिशेने एक ‘ट्रफ’ (हवामानाची कमी दाबाची रेषा) ढकलत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे हा UAC अरबी समुद्रात गोवा किनाऱ्याजवळ सरकेल आणि किनारपट्टीच्या समांतर उत्तर-उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल. ही प्रणाली पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात (Low Pressure Area) रुपांतर होते का, हे लक्षपूर्वक पाहणे महत्त्वाचे असल्याचेही मोडक यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात पुढील काळात म्हणजे २३ मेपर्यंत पूर्व मोसमी वादळी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी मे महिना सरासरीपेक्षा अधिक ओलसर आणि पावसाळी जाणार असे संकेत हवामानाच्या विद्यमान स्थितीवरून दिसत असल्याचेही अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.