Home ठळक बातम्या सहजानंद चौकातील वाहतूक बदल हा “रोगापेक्षा इलाज भयंकर”; ट्रॅफिक पोलिसांनी ते बदल...

सहजानंद चौकातील वाहतूक बदल हा “रोगापेक्षा इलाज भयंकर”; ट्रॅफिक पोलिसांनी ते बदल तातडीने रद्द करावे अन्यथा आंदोलन – माजी सभागृह नेते श्रेयस समेळ

 

कल्याण दि.5 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. मात्र वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेले हे वाहतूक बदल म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे सांगत ते तातडीने रद्द करावे अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ते बंद करू असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिला आहे. (Traffic changes at Sahajanand Chowk are “worse than the cure”; Traffic police should immediately cancel those changes, otherwise there will be agitation – Former House Leader Shreyas Samel)

कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या सहजानंद चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून मार्गात बदल केले आहेत. ज्यामध्ये सहजानंद चौकातून संतोषी माता रोड आणि जैन सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गात बदल करून हे दोन्ही मार्ग येण्या – जाण्यासाठी एक दिशा मार्ग करण्यात आले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सहजानंद चौकात बॅरीकेटिंग करण्यात आले आहे. मात्र या वाहतूक बदलांना माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच या नव्या वाहतूक बदलांमुळे अंतर्गत भागात मोठी वाहतूक कोंडी होऊ लागल्याचे सांगत हे बदल तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हे वाहतूक बदल म्हणजे नागरिकांना विनाकारण वेठीस धरण्याचा प्रकार असून त्यामाध्यमातून वाहतूक पोलिस केवळ आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या नव्या बदलामुळे जैन सोसायटी, संतोषी माता रोड परिसरात आता मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली असून स्थानिक नागरिक त्यामुळे प्रचंड हैराण झाले असल्याचेही समेळ यांनी सांगितले.

.

हे अनावश्यक वाहतूक बदल करण्याऐवजी आहेत त्या नियमांची अंमलबजावणी केली तरी वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल. ज्यामध्ये काझी हॉस्पीटल शेजारी बेतुरकर पाड्याकडे एकदिशा मार्ग, सहजानंद चौकात सिग्नल यंत्रणा, तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर दुकानांबाबरील अनधिकृत पार्किंग हटवणे, अहिल्याबाई चौकातून सहजानंद चौकाकडे येणारी वाहतूक बंद करणे असे महत्त्वाचे बदल श्रेयस समेळ यांनी सुचवले आहेत.
तसेच वाहतूक पोलिसांनी नविन वाहतुकीचे नियम तातडीने बंद करावे अन्यथा आम्हीच हे शिवसेना स्टाईलने बॅरीकेटिंग काढून टाकू असा इशाराही त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा