
कल्याण डोंबिवली दि.22 ऑगस्ट :
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी पाणी साचले होते. मात्र कालपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी हे पाणी ओसरल्यानंतर आता साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाकडून संबंधित भागांमध्ये सफाई, धुरीकरण आणि औषध फवारणी मोहीम सुरु झाली आहे. (Fear of epidemics after water recedes: KDMC starts cleaning, fumigation and spraying campaign)
सोमवार संध्याकाळ सुरू झालेल्या पावसाने पुढचे दोन दिवस कल्याण डोंबिवली परिसराला अक्षरशः झोडपून काढले. परिणामी शहरातील सखल भागात नदी – नाल्याचे पाणी शिरून जलमय झाला होता. परंतु पाऊस थांबल्याने हे सर्व पाणी ओसरून गेले असले तरी रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांच्या सहा.आयुक्तांना आपापल्या प्रभागात साफ-सफाईची मोहिम राबवण्यासह औषध फवारणीचे निर्देश दिले आहेत. विशेषतः वालधुनी, टिटवाळासारख्या सखल भागात तेथील सहा.आयुक्त यांनी आपल्या पथकामार्फत डिप क्लिनींग ड्राईव्ह सुरु करण्यात आला आहे. पावसामुळे झालेला चिखल, वाहून आलेला कचरा आणि गाळ आदी उचलण्याची व्यवस्था करुन साफ-सफाई केली जात आहे.
तसेच डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुर परिस्थितीच्या भागातील घरांमध्ये सखल भागात धूर, जंतुनाशक फवारणीही केली जात आहे.