
कल्याण दि.23 ऑगस्ट :
येत्या काही दिवसांमध्ये विविध धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी कल्याण पश्चिमेत भव्य असा रूटमार्च काढण्यात आला. शहरातील कायदा – व्यवस्था अबाधित असून कोणत्याही अनुचित प्रकाराला रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. (Police take out a grand route march in Kalyan; Organized in the backdrop of upcoming festivals)
कल्याण पश्चिमेच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सहजानंद चौक काळी मशीद येथून हा रूट मार्चला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे केडीएमसी मुख्यालय – शंकरराव चौक – आचार्य अत्रे नाट्यगृह – घेलादेवजी चौक – गांधी चौक – दूधनाका मार्गे पारनाका येथे हा रूटमार्च समाप्त करण्यात आला. या रुट मार्चमध्ये महात्मा फुले तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
त्यांच्यासोबत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी 16 अंमलदार, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी 25 अंमलदार,सीआरएम मोबाईल, खडकपाडा पोलीस स्टेशनचे 6 अधिकारी, 15 अंमलदार, सीआरएम मोबाईल, कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे 1 अधिकारी 10 अंमलदार तसेच SRPF चे 11 अंमलदार, 3 पिटर मोबाईल इतका मोठा अधिकारी आणि इतर पोलीस वर्ग सहभागी झाले होते.
येत्या काळात गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही धर्मियांचे महत्त्वाचे सण असून त्याच्या पार्श्वभूमीवर या रूट मार्चचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.