Home ठळक बातम्या पूरग्रस्त बळीराजाच्या दुःखावर कल्याणातील मराठी कलाकारांची मदतीची फुंकर

पूरग्रस्त बळीराजाच्या दुःखावर कल्याणातील मराठी कलाकारांची मदतीची फुंकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेचा पुढाकार

कल्याण दि. ९ ऑक्टोबर :
काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आलेल्या भीषण पुरामुळे शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे प्रचंड नुकसान झाले. शेती, घरे, जनावरे, संसाराची साधनसामग्री वाहून गेल्याने अनेक कुटुंबांवर संकट ओढावले. या आपत्तीच्या काळात पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी कल्याणातील मराठी कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या माध्यमातून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात ही मदत करण्यात आली. (Marathi artists from Kalyan offer help to flood-hit farmers)

या मदतकार्यात प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी आणि ललित कुलकर्णी या कलाकारांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कल्याण शाखेनेही मोलाचे सहकार्य केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या वतीने ऋतुराज फडके, प्रसाद दाणी या मराठी कलाकारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सुजाण नागरिकांनी तितकाच सकारात्मक प्रतिसाद देत या उपक्रमाला सहकार्य केले. या सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने गोळा झालेल्या मदतीतून बीड जिल्ह्यातील तब्बल ७०० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

ही मदत हिंगणी खुर्द, जेबापिंपरी, शिरापूर गात, फुलसांगवी, जांब, साक्षाळपिंपरी, कपिलधारवाडी, तरडगव्हाण, हिवरसिंगा, ढोकवड, आर्वी, मार्कडवाडी, हाजीपूर, गाजीपूर, कमलेश्वर धानोरा, उमरद जहागीर आणि बहादरपूर या गावांतील पूर ग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात आली.

“आपण गोळा केलेली मदत योग्य हातात पोहोचली पाहिजे,” या भावनेतून सर्व कलाकारांनी स्वतः गावोगावी जाऊन मदतीचे साहित्य पूरग्रस्तांच्या हाती सुपूर्द केले. अनेक दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा शेकडो चेहऱ्यांवर पुन्हा हसू फुलले, तेव्हा या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश लाभल्याची भावना सुप्रसिद्ध कलाकार ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणी यांनी व्यक्त केली. तसेच सामान्य माणसाने ठरवले तर तो मोठे परिवर्तन घडवू शकतो. आताच्या कठीण काळामध्ये शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच आपले कर्तव्य असल्याचेही या उपक्रमातून अधोरेखित झाले.

कलाकार मित्रांनी आणि नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक कार्य अधिकाधिक प्रमाणात राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. “कलाकार म्हणून ‘माणुसकी’ हाच आमचा धर्म आहे,” अशा शब्दांत या मराठी कलाकारांनी भावना व्यक्त केल्या. तसेच या मदतकार्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, संस्थांचे आणि माध्यमांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा