
डोंबिवली, दि.17 नोव्हेंबर :
आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या विशेष तपास मोहिमेत कल्याण गुन्हे शाखा (युनिट–३) ने डोंबिवली पूर्व परिसरात अनेक घातक शस्त्रांचा अवैध साठा घरामध्ये लपवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला थरारक कारवाईत अटक केली आहे. रोशन झा असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याकडून गावठी पिस्टल, तलवार, चाकू, खंजीर अशी विविध घातक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (Major Kalyan Crime Branch Crackdown Ahead of Elections; Notorious Criminal Arrested With 3 Country-Made Pistols, Ammunition, Sword, Dagger and Knives Hidden at Home)
१३ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून या कारवाईचा धागा पुढे सरकला. “एक व्यक्ती विक्रीसाठी अवैध शस्त्रांचा साठा ठेवत आहे,”.
ही माहिती मिळताच गुन्हे शाखा प्रमुख अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. यानंतर या पथकाने डोंबिवली पूर्वेतील गोकुळधाम टॉवर, सी विंग, रूम क्र. २०२ येथे धाड टाकली. पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोशन हिरानंद झा (३३) ला पथकाने शिताफीने पकडले. त्यानंतर घराची झाडाझडती घेतली असता उघड झालेला शस्त्रांचा साठा चकित करणारा होता. ज्यामध्ये
* ३ गावठी पिस्तुलं
* ३ जिवंत काडतुसे
* २ रिकामी मॅगझिन
* लोखंडी खंजीर
* २ धारदार स्टील चाकू
* लोखंडी तलवार
एकूण किंमत अंदाजे ₹2,12,500 इतकी
झा याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, झा हा केवळ साधा आरोपी नसून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारअसल्याचाही तपासात उलगडा झाला आहे. त्याच्यावर
* उल्हासनगर पोलीस ठाण्यात ९ गुन्हे,
* मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ३ गुन्हे,
* तर टिटवाळा पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद आहे.
निवडणुकांच्या तोंडावर उघडकीस आलेला हा अवैध शस्त्रसाठा स्थानिक पोलिसांसाठी मोठे आव्हान उभे करणारा असून ही शस्त्रे नेमकी कोणाला विकण्यात येणार होती याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

























