Home ठळक बातम्या कल्याणपाठोपाठ आता डोंबिवलीतही सोलार हायमास्ट; ‘नेट झिरो एनर्जी’च्या दिशेने केडीएमसीची भक्कम वाटचाल

कल्याणपाठोपाठ आता डोंबिवलीतही सोलार हायमास्ट; ‘नेट झिरो एनर्जी’च्या दिशेने केडीएमसीची भक्कम वाटचाल

“महापालिका क्षेत्रातील प्रत्येक लाईट सोलरवर आणणार” – आयुक्त अभिनव गोयल

डोंबिवली दि.1 डिसेंबर :
कल्याणपाठोपाठ आता डोंबिवलीतही सोलार हायमास्टचा दिमाखदार विस्तार! ‘सस्टेनेबल सिटी’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेने कल्याण-डोंबिवली महापालिकेने आणखी एक ठोस पाऊल टाकत डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात दुसऱ्या सोलार हायमास्टचे उद्घाटन करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडले. या प्रकल्पासाठी पॅनासोनीक इंडियाने सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे. केडीएमसीचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाचा उपक्रम साकारला आहे.
(After Kalyan, now a Solar Highmast installed in Dombivli; KDMC makes a strong move towards ‘Net Zero Energy’)

कार्यक्रमाला शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, पॅनासोनीक इंडियाचे संदीप जयपाल, राजा मुखर्जी, सचिन ठुबे, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांसह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयुक्त अभिनव गोयल म्हणाले, “महापालिका क्षेत्रातील प्रत्येक हायमास्ट आणि महत्त्वाच्या इमारती सौरऊर्जेवर चालल्या पाहिजेत, हे आमचे ध्येय आहे. कल्याण-डोंबिवलीतील 144 हायमास्ट पूर्णतः सोलारवर आणण्याचे नियोजन सुरू असून सर्व प्रशासकीय व शासकीय इमारतींवर सोलार सिस्टम बसवण्याची तयारीही वेगाने सुरू आहे. नागरिकांनी आणि सोसायट्यांनीही त्यांच्या इमारतींवर सोलार पॅनल बसवून ऊर्जा बचतीत हातभार लावावा. यामुळे वीज बचत, खर्चात कपात, प्रदूषण नियंत्रण आणि ग्रीन एनर्जीला चालना मिळून शहर ‘सस्टेनेबल सिटी’कडे वेगाने वाटचाल करेल.”

विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले की महापालिकेच्या इमारतींवर 0.45 मेगावॅट सौरऊर्जा प्रणाली, नव्या इमारतींवर सोलारची अनिवार्यता, 250 हून अधिक इमारतींवर कार्यान्वित 4.5 मेगावॅट सौर क्षमता, सर्व उद्याने व स्मशानभूमींमध्ये सोलार सिस्टम, तसेच टिटवाळा उद्यान हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे पहिले उद्यान अशा अनेक पथदर्शी प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नवीन सोलार हायमास्ट शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणारा असून त्याला पारंपरिक वीजपुरवठ्याची गरज भासणार नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यासही तो कार्यरत राहणार असल्याने शहरातील प्रमुख चौकांची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

केडीएमसीकडून उचललेले हे पाऊल भविष्यातील ऊर्जा बचत, हरित ऊर्जा निर्मिती आणि प्रदूषणमुक्त शहराच्या दिशेने नक्कीच आदर्श ठरणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा