
कल्याण डोंबिवली दि.12 डिसेंबर :
महापालिका निवडणुक केव्हाही जाहीर होण्याच्या शक्यतेने राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना दुसरीकडे शहरांतील तापमानाचा पारा मात्र दिवसागणिक कमी होताना दिसत आहे. थंड हवेच्या ठिकाणासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये आज 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कल्याणात त्यापेक्षा थोडे अधिक म्हणजे 12.8 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. (The cold wave has intensified; Mahabaleshwar records 12.2°C, while Kalyan drops to 12.8°C and Dombivli to 13.4°C)
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा पारा खाली खालीच येत चालला आहे. त्यामुळे आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी यंदाच्या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. काल म्हणजे गुरुवारी 11 डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये अवघ्या 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ आज कल्याण डोंबिवलीतील तापमान आणखी कमी झाले असून कल्याणमध्ये तर चक्क 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर हिल स्टेशनमध्ये सर्वात लाडके डेस्टिनेशन असलेल्या महाबळेश्वर येथे 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. त्यापाठोपाठ डोंबिवलीचा पाराही कालच्या 13.7 अंश सेल्सिअसवरून आज 13.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आज नोंदवण्यात आलेल्या तापमानाची आकडेवारी
कल्याण – 12.8°C
डोंबिवली – 13.4°C
पनवेल – 12.8°C
बदलापूर – 10.4°C
कर्जत – 10.7°C
नवी मुंबई – 14.4°C
विरार – 13.1°C
ठाणे – 14.5°C
डहाणू – 15.1°C
मुंबई (SCZ) – 14.9°C
रत्नागिरी – 16.1°C
माथेरान – 18°C
महाबळेश्वर – 12.2°C
लोणावळा – 11.9°C
आंबोली – 9.8°C


























