
डोंबिवली दि.17 डिसेंबर :
स्थानिक स्वराज संस्थांच्या त्यातही दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या महानगरपालिका निवडणुक भाजप आणि शिवसेनेकडून युतीमध्ये लढण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली असली तरी युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याची दवंडी नेतेमंडळींकडून दिली जात असताना मग युती करून आमच्या हक्काच्या संधी का हिरावून घेतल्या जात आहेत अशी चर्चा आतापर्यंत केली जात होती. मात्र भाजपच्या डोंबिवलीतील एका कार्यकर्त्याने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट करून युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील घुसमट अतिशय ठळक शब्दांत मांडली आहे. तसेच युतीच्या नावाखाली त्यांच्या हक्काच्या संधी हिरावून घेतल्या गेल्या,तर त्या घामाची, त्या त्यागाची किंमत काय उरते? असा परखड सवालही करत आपल्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (If the rights and opportunities of grassroots workers are taken away in the name of an alliance, then what is the value of their sweat and sacrifice?” — BJP Worker’s Post Goes Viral)
गेल्या दोन आठवड्यापूर्वी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजप यांनी विविध राजकीय घडामोडीनंतर अचानक माघार घेतली. आणि मग एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मैत्रीसोबतच युतीचाही सूर आळवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणाऱ्या दोन्ही पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांच्या आनंदावर जणू काही विरजण पडले. इतकी वर्षे पक्षासाठी रस्त्यावर उतरून, गल्लीबोळात फिरुन वर्षानुवर्षे पक्षासाठी घाम गाळलेल्या कार्यकर्त्याच्या त्यागाचे काय ? असा प्रश्न कार्यकर्ते मंडळी विचारत आहेत. तर डोंबिवलीतील भाजप मंडळ सरचिटणीस मयुरेश शिर्के यांनी ही कार्यकर्त्यांच्या मनातील संपूर्ण अस्वस्थता अतिशय रास्त शब्दांमध्ये मांडली आहे. ज्यामध्ये मांडण्यात आलेल्या विचारांना भाजपसह मित्रपक्ष शिवसेनेतील कार्यकर्त्याचीही नक्कीच संमती मिळेल.
भाजप कार्यकर्त्याची ही पोस्ट जशीच्या तशी…
भाजप म्हणजे केवळ पक्ष नाही…
भाजप म्हणजे कार्यकर्त्यांचा श्वास, घाम आणि संघर्ष.
उमेदवार कोण आहे, चेहरा कोण आहे याचा विचार न करता—
ज्यांनी जीवाची बाजी लावली, अन्नपाणी विसरलं, घरदार बाजूला ठेवलं…
रस्त्यावर उतरून, गल्लीगल्लीत फिरून, वर्षानुवर्षे संघटना उभी केली—
तो खरा भाजपाचा कार्यकर्ता आजही फक्त “कार्यकर्ता”च राहतो.
निवडणूक आली की तोच कार्यकर्ता सर्वात पुढे उभा असतो.
झेंडे लावतो, सभा भरतो, लोकांना समजावतो, अपमान गिळतो…
आज त्या कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या निवडणुका आहेत.
आज त्यांच्या आयुष्यातील कष्टांचा हिशोब मांडायची वेळ आली आहे.
आणि अशा वेळी जर युतीच्या नावाखाली त्यांच्या हक्काच्या संधी हिरावून घेतल्या गेल्या,
तर त्या घामाची, त्या त्यागाची किंमत काय उरते?
म्हणूनच मनापासून वाटतं—
युती नको. भाजपाने स्वतंत्र लढावं.
स्वतंत्र लढलं तरच प्रत्येक कार्यकर्त्याला स्वप्न पाहण्याचा हक्क मिळेल.
स्वतंत्र लढलं तरच ज्यांनी पक्ष वाढवला,
त्यांनाच पक्षासाठी उभं राहण्याची संधी मिळेल.
निवडणुकी नंतर काय त्या युत्या आघाड्या नक्कीच करता येतील.
ही मागणी सत्तेसाठी नाही…
ही मागणी पदासाठी नाही…
ही मागणी आहे न्यायासाठी—
त्या कार्यकर्त्यासाठी, ज्याने आयुष्यभर फक्त “भाजप” जगलं आहे.
आज नाही तर कधी?
कार्यकर्त्यांसाठी नाही तर कोणासाठी?


























