
डोंबिवलीमध्ये भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ
डोंबिवली दि.19 डिसेंबर :
इथल्या नागरिकांशी निगडीत विकासकामांना पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर कोणी ओळखीचा व्यक्ती, शेठ – नेता नाही पारदर्शकपणे काम करणारी व्यक्ती महापौरपदी असणे गरजचे असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. (A Transparent Working Individual, Not a “Seth-Leader,” Is Needed as Mayor – BJP State President Ravindra Chavan)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या भुलथापांना बळी पडू नका, अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने भूलथापा देतील, अनेक जण गाड्यांच्या काचाही खाली करत नाही. अनेक जण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्यासमोर येतील. पण 24 तास तुमच्यासोबत असणाऱ्या रवी चव्हाणला विसरू नका अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना भावनिक आवाहनही यावेळी केले.
केरळसारख्या डाव्या विचारसरणीच्या राज्यामध्ये वेगळा विचार केला आणि विकासाला मतदान करण्यात आले. तिथल्या महानगरपालिकेत नागरिकांनी भाजपला केवळ कौल दिला नाही, तर भाजपचा महापौरही बसवला. जर केरळसारखे राज्य असा विचार करत आहे याचा अर्थ लक्षात घ्या. येणारा काळ आणि काळाची असणारी गरज ही लक्षात घेता तुम्हाला विकासासाठी मतदान करायचे आहे अशा शब्दांत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गतिमान करण्याचे काम झाले आहे. हा वेगाने विकास करताना सबका साथ, सबका विकास सबका विश्वास आणि प्रयास या चारही गोष्टींचा मेळ त्यांच्या कामामध्ये असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























