Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेत सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांमुळे टळला आगीचा मोठा अनर्थ

कल्याण पूर्वेत सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांमुळे टळला आगीचा मोठा अनर्थ

युनिट ऑफिसरसह त्यांच्या पथकाच्या धाडसाचे होतेय कौतुक

कल्याण दि.6.ऑक्टोबर :
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटे 3.45 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मात्र केडीएमसीसाठी काम करणाऱ्या सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे याठिकाणी मोठा अनर्थ टळल्याने या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली परिसरात असलेल्या शीतल कॉम्प्लेक्समध्ये एका घरातील एसीच्या बाहेरील युनिटला नुकतीच आग लागली होती. त्याचवेळी सुमित एल्कोप्लास्टचे युनिट ऑफिसर मच्छिंद्र चंदरबांडे हे कुणाल जाधव आणि योगराज पाटील यांच्यासह नेहमीप्रमाणे प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी फिरत होते. ही पाहणी करत असताना मच्छिंद्र यांना शीतल कॉम्प्लेक्समधील त्या एसी युनिटला आग लागल्याचे निदर्शनास आले. तसे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट इमारतीमध्ये धाव घेतली. आणि तत्काळ संबंधित घराचा दरवाजा ठोठावून रहिवाशांना आगीची माहिती दिली. तसेच त्यांच्या शेजारील घरांचेही दरवाजे ठोठावून त्यांना या आगीबाबत सतर्क केले. इतकेच नाही तर मच्छिंद्र यांनी आपल्या दोन्ही सहकाऱ्यांसमवेत ही आग विझवण्यासाठी संबंधित रहिवाशांना केलेल्या मदतीमुळे ती इतरत्र पसरू शकली नाही. काही वेळातच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि मग त्यांनी पूर्णपणे या आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र युनिट ऑफिसरने दाखवलेल्या जागरूकतेमुळे आणि वेळेवर दिलेल्या धाडसी प्रतिसादामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. त्याबद्दल अग्निशमन दलासह शीतल कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवाशांना मच्छिंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत मनापासून आभार मानले आहेत. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सुमित एल्कोप्लास्टकडूनही या कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा