
डोंबिवलीतील पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
डोंबिवली दि.28 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्ष स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याचे सुतोवाच पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे यांनी केले आहे. आम आदमी पक्षाच्या डोंबिवलीतील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोरे यांनी ही घोषणा केली. डोंबिवली पश्चिमेतील वाशी बस स्टॉपसमोर हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. (Aam Aadmi Party to Contest All Seats in the Kalyan-Dombivli Municipal Corporation Elections – State Secretary Dr. Abhijeet More)
येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष नेहमीप्रमाणे सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार आहे. तर दिल्ली आणि पंजाब सरकारप्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य, चांगले रस्ते अशा मूलभूत मुद्द्यांवर इथली निवडणूक आम्ही लढवणार असल्याचे पक्षाचे मुख्य निवडणूक सल्लागार ऍड. आकाश वेदक यांनी यावेळी सांगितले .
आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीसाठी जनतेला विचारून आपला जाहीरनामा बनवणार असल्याचे कल्याण डोंबिवली महिला आघाडी अध्यक्षा रेखा रेडकर यांनी या दरम्यान जाहीर केले.
कल्याण डोंबिवलीत विरोधी पक्षाचे अनेक नेते, सत्ताधारी पक्षात गेले आहेत. जनता आता नवीन विकल्पच्या शोधात आहे,तरी येणाऱ्या निवडणुकीत मतदार आम आदमी पार्टीला नक्की यश मिळवून देईल असा विश्वास कल्याण जिल्हाध्यक्ष ऍड. धनंजय जोगदंड यांनी सांगितले .
या सोहळ्यादरम्यान आम आदमी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अभिजित मोरे ,प्रदेश सह सचिव अमोल मोरे, प्रदेश महिला संघटक नीलम व्यवहारे ,कल्याण जिल्हा अध्यक्ष ऍड. धनंजय जोगदंड ,कल्याण जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष रेखा रेडकर, मुख्य निवडणूक सल्लागार ऍड. आकाश वेदक ,राज्य सोशल मीडिया टीमचे निलेश व्यवहारे ,निवडणूक समितीचे अजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते .


























