Home क्राइम वॉच पोलीसांच्या कल्याणातील परिमंडळ ३च्या ताफ्यात अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास प्रक्रियेला...

पोलीसांच्या कल्याणातील परिमंडळ ३च्या ताफ्यात अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल; गुन्हे तपास प्रक्रियेला मिळणार गतिमानता

कल्याण दि.5 डिसेंबर :
ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या कल्याण पोलिसांच्या परिमंडळ 3 च्या ताफ्यात सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन (Forensic Van) दाखल झाली आहे. या व्हॅनमुळे कल्याण परिसरातील गुन्हे तपास आणि प्रकटीकरण प्रक्रियेला अधिक वेग तसेच वैज्ञानिक कवच प्राप्त होणार आहे. (Advanced Forensic Van Added to Kalyan Police Zone 3 Fleet; Crime Investigation to Become Faster and More Efficient)

कल्याण पोलिसांच्या परिमंडळ ३ अंतर्गत महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, मानपाडा आणि टिळकनगर असे एकूण 8 पोलीस ठाणे येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची तात्काळ तपासणी करण्यासाठी ही व्हॅन कार्यरत राहणार आहे.

या फॉरेन्सिक व्हॅन (Forensic Van) मध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहाय्यक तसेच प्रशिक्षित प्रयोगशाळा तज्ज्ञ उपलब्ध असून घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचे भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल विश्लेषण, उच्च प्रतीच्या फॉरेन्सिक उपकरणांच्या सहाय्याने करणे सोयीस्कर होणार आहे. त्यासोबतच घटनास्थळ तपासणी किट्स, नमुना संकलन साधने आणि अत्याधुनिक वैज्ञानिक सामग्रीमुळे प्राथमिक अहवाल तयार करण्याची प्रक्रियाही अधिक वेगवान होणार असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.

तर फॉरेन्सिक व्हॅनच्या उपलब्धतेमुळे घटनास्थळी पुरावे तात्काळ गोळा करणे शक्य, तपास अधिक वेगवान – पारदर्शक, आरोपींविरोधातील ठोस – वैज्ञानिक पुरावे न्यायालयात सादर करण्यास मोठी मदत मिळणार असल्याने गुन्हे उकलण्याचे प्रमाणही वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ही अत्याधुनिक Forensic Van ही आठवड्यातील दोन दिवस तर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी २४ तास कल्याणच्या पोलीस नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध राहणार असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा मोठा सक्षम दुवा ठरणार असल्याचेही डी सी पी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा