
डोंबिवली दि.18 नोव्हेंबर :
आगामी महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच कल्याण–डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच वाढले आहे. विरोधी पक्षातील प्रभावशाली नेते आणि पदाधिकाऱ्यांसह एकमेकांच्या पक्षातील बड्या नेत्यांनाही आपल्या गोटात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार ‘पॉलिटिकल पूलिंग’ सुरू आहे. या घडामोडीत आज आणखी एक महत्त्वाची भर पडली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी आज परत भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमूख उपस्थितीत महेश पाटील यांनी हा भाजप प्रवेश केला आहे. (Another major political development in Kalyan-Dombivli; Shiv Sena Taluka Chief Mahesh Patil returns to the Bharatiya Janata Party (BJP)
कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासूनच भाजपमध्ये इनकमींगचा धडका सुरू आहे. आज सकाळी शिवसेनेतीलच युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. त्याला अवघे काही तासही उलटत नाहीत तोच भाजपने आपल्या महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक धक्का दिला. कल्याण ग्रामीण भागातील मोठे प्रस्थ आणि पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी महेश पाटील यांनी आज परत भाजपमध्ये प्रवेश करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्यासह माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, सायली विचारे यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायच्या बाकी असल्या तरी राजकीय धुरळा मात्र आत्ता पासूनच शिगेला पोहोचला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांसह मित्रपक्षातील बडे नेतेही आपल्याकडे घेण्यासाठी भाजप-शिवसेनेमध्ये अक्षरशः स्पर्धाच लागली आहे. ज्याची उदाहरणे गेल्या काही दिवसांत झालेल्या पक्ष प्रवेशावरून दिसून येत आहेत. यामध्ये आता कल्याण ग्रामीणमध्ये मोठा दबदबा असणाऱ्या महेश पाटील यांच्या नावाचीही भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. महापालिकेतील आपली ‘पॉवर इक्वेशन’ मजबूत ठेवण्यासाठी या नेत्यांची मोर्चेबांधणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

























