
विकासाच्या दृष्टीने आणि लोकहितासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय
कल्याण दि.16 डिसेंबर :
कल्याणमधील काँग्रेस पक्षाला सध्या एकावर एक धक्के बसत असून माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काही तासही उलटले नसताना माजी शहराध्यक्ष विमल ठक्कर यांनीही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या गतिमान विकासाभिमुख कार्याने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विमल ठक्कर यांनी दिली आहे. (Another Major Setback for Congress; After Sachin Pote, City President Vimal Thakkar Also Resigns from the Party)
पक्ष सोडण्याचा निर्णय अतिशय कठीण…
काँग्रेस पक्ष आणि पक्ष नेतृत्वाबाबत आमच्या मनात कोणतीही नाराजी नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय दत्त हे आमच्यासाठी गुरुस्थानी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणातील अनेक पैलू शिकण्याची संधी मिळाली. गेली तब्बल २७ वर्षे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात करत आम्ही काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय हा अत्यंत जड अंतःकरणाने घ्यावा लागत असल्याची प्रतिक्रिया ठक्कर यांनी यावेळी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासयज्ञात सहभागी होण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाने प्रेरित होऊन, त्यांच्या विकासयज्ञात सहभागी होण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आमची कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. तसेच नगरसेवकपदाच्या तिकीटासाठीही हा निर्णय घेतलेला नाही. केवळ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची साथ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशिर्वाद घेऊन लोकहितासाठी काम करण्याची आणि कल्याण पश्चिमेचाही विकास कल्याण पूर्व – डोंबिवलीप्रमाणे व्हावा, हीच आमची मनापासून इच्छा असल्याची प्रांजळ भावना ठक्कर यांनी व्यक्त केली.
विकास आणि लोकहितासाठी शिवसेनेसोबत…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आज कल्याण लोकसभा मतदारसंघात अभूतपूर्व विकास होत आहे. मेट्रो प्रकल्प, सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे विस्तृत जाळे, नुकतेच भूमिपूजन झालेले अत्याधुनिक क्रीडा संकुल तसेच विविध मोठमोठ्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प, यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि व्हिजनरी नेतृत्वामुळे त्यांची संपूर्ण देशात ‘इन्फ्रामॅन’ अशी ओळख निर्माण झाली असून विकासाच्या आणि लोकहितासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विमल ठक्कर यांनी यावेळी दिली.



























