
जाहीर माफी न मागितल्यास राज्यभर आंदोलनचाही इशारा
कल्याण दि.8 जानेवारी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात कल्याण जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात निवेदन देत करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच संजय राऊत यांनी जाहीर माफी न मागितल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा कल्याण जिल्हा भाजयुमोतर्फे देण्यात आला आहे. (BJYM demands action against Sanjay Raut over remarks on BJP; memorandum submitted in Kalyan)
बुधवारी सकाळी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाबाबत एक वक्तव्य केले आहे. त्याविरोधात भाजपमध्ये संतापाची लाट उसळली असून कल्याण जिल्हा भाजयुमोचे कार्याध्यक्ष गौरव गुजर यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात खासदार राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी भाजपाबाबत अतिशय खालच्या पातळीला जाऊन अतिशय वाईट वक्तव्य केले आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाला आमची आई समजतो आणि आमच्या आईबद्दल खासदार राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजयुमोतर्फे पोलिसांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच खासदार संजय राऊत यांनी भाजपविरोधात केलेल्या या वक्तव्याबाबत जाहीर तोंडी किंवा लेखी माफी मागावी अन्यथा त्याविरोधात राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


























