
न्यू जर्सी (अमेरिका) दि.28 ऑगस्ट :
सध्या अमेरिकेत राहणारे संतोष कुंडलिक म्हात्रे, मूळचे कल्याण तालुक्यातील म्हारळ गावचे असून, गेली १८ वर्षे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. संतोष म्हात्रे हे म्हारळ गावच्या सरपंच सौ. नीलिमा नंदू म्हात्रे यांचे दिर असून सध्या ते न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेझिडेंट पदावर कार्यरत आहेत. (Decorations at Chhatrapati’s forts during Ganeshotsav in New Jersey: The initiative of Santosh Mhatre, originally from Kalyankar, is in the news)
वैशिष्ट्यपूर्ण सजावटीची परंपरा…
संतोष म्हात्रे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. प्रत्येक वर्षी त्यांच्या घरी गणेशोत्सवासाठी केलेली सजावट नवनवीन आणि अर्थपूर्ण संदेश देणारी असते. काही वेळा सामाजिक प्रश्न, तर काही वेळा भारतातील राष्ट्रीय कार्यगौरव किंवा ऐतिहासिक कामगिरी हे त्यांचे सजावटीचे विषय ठरतात. त्यामुळे परदेशातील भारतीय समुदायात त्यांच्या सजावटीला विशेष दाद मिळते.
यंदाची थीम – छत्रपतींची दुर्गसंपदा…
या वर्षीच्या सजावटीसाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंपदेची थीम निवडली आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी बांधलेले किल्ले हे फक्त लष्करी गड नसून, त्यामागे दडलेली दूरदृष्टी, नागरी अभियांत्रिकी, धोरणात्मक नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य आजही अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरतात.
अलीकडेच युनेस्कोने या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला असून, हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. “ही मान्यता मिळाल्यामुळे महाराजांच्या कार्याची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण भारताचा सन्मान आहे,” असे संतोष म्हात्रे म्हणाले.
नव्या पिढीसाठी प्रेरणा…
या सजावटीमागचा मुख्य हेतू फक्त आकर्षक प्रदर्शन करणे नसून, परदेशात वाढणाऱ्या मुलांना आपल्या इतिहासाशी जोडून ठेवणे हा आहे. संतोष म्हात्रे म्हणतात, “गणेशोत्सव हा शिकण्याचा आणि प्रेरणा घेण्याचा क्षण आहे. या सजावटीतून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल, त्यांची व्यवस्थापनशक्ती आणि अभियांत्रिकी कौशल्य याबद्दल माहिती मिळते. यामुळे त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो आणि ते आपल्या मुळांशी जोडलेले राहतात.
म्हारळ गावाशी घट्ट नाळ…
व्यावसायिक प्रगतीसाठी अमेरिकेत स्थायिक झाले तरी संतोष म्हात्रे यांचे गावाशी घट्ट संबंध टिकून आहेत.म्हारळ गावातील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने रस घेतात. गावातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहनही देतात.