Home ठळक बातम्या वैतागवाडी : कल्याणातील वाहतूक कोंडीचे ग्रहण अधिकच गडद; वाहतूक नियोजन हाताबाहेर

वैतागवाडी : कल्याणातील वाहतूक कोंडीचे ग्रहण अधिकच गडद; वाहतूक नियोजन हाताबाहेर

कल्याण दि.22 ऑगस्ट :
कल्याण शहराने गुरूवारी कधीही न भूतो अशी भयानक वाहतूक कोंडी अनुभवली. ज्यामध्ये सामान्य नागरिक अडकून पडले, शालेय विद्यार्थी अडकून पडले, रुग्णालयात जाणारे पेशंट अडकून पडले, या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर अडकून पडले, कोर्टातील वकील अडकून पडले, व्यावसायिक अडकून पडले, कर्मचारी अडकून पडले. इतकेच नाही तर दूध, औषधं, पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या हजारो गाड्याही अडकून पडल्या. कल्याण शहराची इतकी भयाण अवस्था यापूर्वी कधीही झाली नव्हती. मात्र काल निर्माण झालेली ही परिस्थिती म्हणजे शहर नियोजनातील भूतकाळात झालेल्या तसेच वर्तमानात होणाऱ्या चुकांची परिणीती. इतकेच नाही तर उद्यावर येऊन ठेपलेल्या एका भीषण संकटाची नांदी ठरली आहे. ( frustration: Traffic congestion in Kalyan is getting worse; Traffic planning is out of hand)

कधी काळी ‘निसर्गाच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक आणि टुमदार वाड्यांचे शहर’ म्हणून ओळख असलेले कल्याण आज गर्दी, गोंधळ आणि वाहतुकीच्या समस्येमुळे अक्षरशः वैतागवाडी झाले आहे. गेल्या काही वर्षांत शहराने प्रचंड वेगाने नागरीकरणाचा आणि लोकसंख्या वाढीचा अनुभव घेतला. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला पुरेल अशा पायाभूत सुविधा विकासाचे नियोजन झाले नसल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनली आहे. याचे कालच्यापेक्षा ज्वलंत आणि भीषण उदाहरण बहुधा कोणतेही नसेल.

वाढती वाहनसंख्या – सर्वात मोठे संकट…
एका अंदाजानुसार, दर महिन्याला शेकडो नवीन चारचाकी आणि दुचाकी कल्याण परिसरात नोंदणीकृत होत आहेत. प्रत्येक घरात सरासरी दोन वाहने असणे आता नित्याचे झाले आहे. ही वाहने चालवण्यासाठीचे रस्ते मात्र दशकानुदशके तेच आहेत. परिणामी रस्त्यावर वाहनांचा सुळसुळाट होऊन शिस्तबद्ध वाहतुकीऐवजी प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे.

रस्त्यांची बिकट अवस्था…
कल्याणमधील बहुतेक रस्ते अरुंद, खड्डेमय आणि अव्यवस्थित आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते आणि त्यामुळे मागे-मागे लांबच लांब रांगा लागतात. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू असून ते महिनोनमहिने अपूर्ण राहते. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा अधिकच उडतो.

बेशिस्त वाहनचालक आणि पार्किंगचा गोंधळ…
वाहतुकीच्या कोंडीचे आणखी एक कारण म्हणजे बेशिस्त वाहनचालक. सिग्नल तोडणे, डावीकडून ओव्हरटेक करणे, रस्त्यावरच गाडी उभी करणे, दुचाकीस्वारांचे वेड्यावाकड्या पद्धतीने गाडी चालवणे – या गोष्टी रोजच घडत आहेत. रिक्षा चालक तर आपल्याच मनमर्जीने थांबतात, वळतात. यामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होतो. पार्किंगची समस्या तर एवढी गंभीर आहे की बाजारपेठा, स्टेशन परिसर किंवा शाळांच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्याने पादचाऱ्यांनाही चालणे अवघड होते.

अपुरी उपाययोजना…
वाहतुकीसाठी विशेष चौकशी पथके, पर्यायी रस्ते, मल्टी-लेव्हल पार्किंग (स्टेशन परिसरातील एकमेव प्रकल्प वगळता) यांसारखे प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत. त्यातही कल्याणात आणि आसपासच्या भागामध्ये पायाभूत विकासाचे अनेक मोठाले प्रकल्प सुरू असून त्या तुलनेत ट्रॅफिक पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी, अपुरी आहे. ज्यामुळे अस्तित्वात असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन करणे अतिशय जिकिरीचे बनले आहे. तर शहरातील वस्तुस्थिती विचारात न घेता काढल्या जाणाऱ्या वाहतूक बदलाच्या अधिसूचनाही या गोंधळात भर घालत आहेत.

सण-उत्सव काळात काय होणार?…
कालचा विचार करता एरवीच्या सर्वसाधारण दिवशी जर एवढी बिकट परिस्थिती असेल तर येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्रौत्सव अशा सण-उत्सव काळात कालच्यापेक्षा भयानक परिस्थिती उद्भवू शकते. ज्याचा सर्वात मोठा फटका रुग्णवाहिका, आणि आपत्कालीन वाहनांना वेळेवर रुग्णालयात पोहोचणे हीच मोठी समस्या बनते. इतकेच नाही तर कालच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक डॉक्टरही या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने रुग्णांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले.

या मुद्द्यांवर गांभीर्याने काम करणे आवश्यक…

शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत असे चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, फ्लायओव्हर आणि बायपासची निर्मिती, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, बससेवा वाढवणे, स्थानकांवर पार्क-एंड-राईड सुविधा उपलब्ध करणे यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो अशा मुद्द्यांवर गांभीर्याने काम करणे आवश्यक बनले आहे.

या सर्वांवर कल्याणकरांना आता सर्वाधिक अपेक्षा आहे ती प्रशासनाच्या ठोस कारवाईची आणि त्याला राजकीय नेत्यांनी पूर्णपणे पाठिंबा देण्याची. अन्यथा, वाढत्या गर्दीमुळे आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे जीवनमानावर परिणाम होईलच, शिवाय आर्थिक घडामोडींनाही फटका बसेल. वेळ वाया जाणे, इंधनाचा अपव्यय, प्रदूषण आणि ताणतणाव हे सर्व घटक इथल्या नागरिकांचा वैताग अधिकच वाढवत आहेत.

 

©️©️©️

टीम लोकल न्यूज नेटवर्क – LNN

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा