Home ठळक बातम्या शाश्वत-सुरक्षित शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची – आयुक्त अभिनव गोयल

शाश्वत-सुरक्षित शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची – आयुक्त अभिनव गोयल

केडीएमसीतर्फे प्रथमच आयोजित चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.27 सप्टेंबर :
“स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान वा पायाभूत सुविधा नव्हे; तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते. शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल, तर त्याची प्रगती शक्य नाही,” असे प्रतिपादन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. (Housing complexes play an important role in building a sustainable and safe city – Commissioner Abhinav Goyal)

कल्याण-पश्चिम येथील मोहन अल्टीझा या आदर्श गृहसंकुलात प्रथमच ‘शाश्वत-सुरक्षित इमारत’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. आयुक्त गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत – यांत्रिकी) प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला.

चर्चासत्रात कल्याण-डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा आणि अग्निसुरक्षा या सात महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

आयुक्त गोयल यांनी स्पष्ट केले की, “या सात मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या सोसायट्यांना केडीएमसीच्या वतीने मानांकन आणि इतर प्रोत्साहनपर फायदे देण्याचा विचार सुरू आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांना सुरुवातीला समज देण्यात येईल आणि भविष्यात आर्थिक दंड लावला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, “नागरिकांच्या छोट्या-छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो. प्रत्येक सोसायटीपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

कार्यक्रमापूर्वी आयुक्त गोयल यांनी मोहन अल्टीझा सोसायटीतील घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या उपआयुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत – यांत्रिकी) प्रशांत भागवत, महापालिकेचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील,कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, अशोक घोडे, शैलेश मळेकर, जितेंद्र शिंदे, सहा. आयुक्त प्रिती गाडे, धनंजय थोरात, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्तमानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा