
कल्याण दि.14 डिसेंबर :
ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागातर्फे आयोजित जनजागृती सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवलीतील विविध ग्रुपच्या माध्यमातून शेकडो सायकलिस्टने यात उत्स्फूर्त सहभाग घेत ऊर्जा बचतीचा संदेश दिला. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत हेदेखील या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. (Hundreds of cyclists in Kalyan-Dombivli spread the message of energy conservation; enthusiastic response to KDMC-organised cycle rally on the occasion of Energy Conservation Week)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या संकल्पनेतून ही सायकल रॅली काढण्यात आली. केडीएमसी मुख्यालयापासून कल्याणमध्ये एक आणि डोंबिवलीसाठी एक अशा दोन सायकल रॅली काढण्यात आल्या. कल्याणातील सायकल रॅली ही पत्रीपुल वालधुनी, सुभाष चौक – भवानी चौक – खडकपाडा चौक – दुर्गाडी चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे पुन्हा केडीएमसीमध्ये येऊन समाप्त झाली. तर डोंबिवलीत गेलेली सायकल रॅली ही पत्रीपूल, म्हसोबा चौक, घारडा सर्कल, टिळक चौक, इंदिरा चौक – फडके रोड, ठाकुर्ली-पत्रीपूलमार्गे पुन्हा महापालिका मुख्यालयात येऊन समाप्त झाली. यामध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, बाईकपोर्ट सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिंग क्लब, एव्हरग्रीन सायकलिस्ट ग्रुप आणि पलावा सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून 300 सायकलिस्ट सहभागी झाले होते. ज्यात ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांचाही संदेश होता. ऊर्जा बचत ही राष्ट्रीय बचत, ऊर्जा वाचवा, पैसे वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा, सौर ऊर्जा वापरा स्वच्छ भविष्य घडवा अशा आशयाचे अनेक संदेश या सायकलिस्टनी आपापल्या सायकलवर प्रदर्शित केले होते.

ऊर्जेची बचत ही काळाची गरज बनली असून त्याचे आपल्या पर्यावरणावर चांगला परिणाम होईल. दैनंदिन जीवनात बदल करावा, दररोज विजेची थोडी थोडी बचत केल्यास मोठा हातभार लागेल असे आवाहन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी केले. तर दुसरा कोणी तरी येऊन सुरुवात करेल यासाठी वाट न पाहता आपण स्वतःपासूनच ऊर्जा बचतीला प्रारंभ करण्याची गरज पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या माहिती फलकांचे अनावरण करण्यासह विद्युत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे यांनी त्यावरील एक गीतही सादर केले. या ऊर्जा सप्ताहाअंतर्गत हा आठवडाभर सरकारी कार्यालय(१५ डिसेंबर), शाळा- महाविद्यालय(१६ ते १८ डिसेंबर), रेल्वे स्टेशन परिसरासह (१९ डिसेंबर) कल्याण डोंबिवलीतील रहिवासी सोसायट्यांमध्ये (२०- २१ डिसेंबर) जनजागृती कार्यक्रम होणार असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
यावेळी केडीएमसीचे मुख्य लेखा परीक्षक बनसोडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.


























