
कल्याण – डोंबिवली शहरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ
कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेसाठी स्वतंत्र अत्याधुनिक यंत्रणा
-टाटा कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विकासप्रकल्प मार्गी
कल्याण डोंबिवली दि. 18 मे :
कल्याण डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोनही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारुपास येतील. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Kalyan Dombivali will become the cleanest cities in the country – Deputy Chief Minister Eknath Shinde)
कल्याण – डोंबिवली महापालिकेमध्ये सुमित एल्कोप्लास्टच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या केडीएमसीच्या कचरा संकलन वाहतूक, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आज आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा रविवार, १८ मे रोजी डोंबिवली पूर्वेतील वै. संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. तसेच या प्रसंगी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केले.
या स्वच्छता अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुमित एल्कोप्लास्टमार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ७ प्रभागातील कचरा संकलन आणि वाहतुक याचबरोबर रस्ते सफाईकरीता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी हे अभियान राबविण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला आहे.
या अभियानांतर्गत शहर स्वच्छतेच्या कामाच्या माध्यमातून प्रभागातील कामकाजावर नियंत्रण ठेवणेकरीता २४७ कमांड कंट्रोल सेंटर, नागरिकांमार्फत प्राप्त तक्रारींचे निवारण करणेकरीता २४ तास कार्यरत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच ५ ठिकाणी वेस्ट टू वेल्थ सेंटर्स उभारणी करण्यासमवेतच प्राथमिक कचरा संकलनाकरीता पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणारी वाहने आणि चार्जिंग स्टेशनसह अत्याधुनिक पाकींग व्यवस्था उभारली गेेली आहे. तर कचरामुक्त रस्ता संकल्पने अंतर्गत शहरातील एकूण रस्त्यापैकी ३० टक्के रस्ते कचरामुक्त राहणेकरीता स्वतंत्र यंत्रणा, मृत जनावरांचे अवशेष व हरीत कचरा, घरगुती घातक कचरा संकलनाकरीता स्वतंत्र यंत्रणा, कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती करीता अत्याधुनिक सोयीसुविधांसह ऑटो वर्कशॉप, चाळ परिसर व रस्त्यालगत कचरा उचलण्यासाठी सिटी हुक लोडर यंत्रणा ( कचरा उचलणारी अत्याधुनिक वाहने ) आहे. अशा यंत्रणेच्या माध्यमातून शहरात कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
वाढती लोकसंख्या पाहता स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे – खा. डॉ. श्रीकांत शिंदे…
कल्याण डोंबिवली या दोन्हीही शहरांचा वेगाने विकास होतो आहे. येथील वाढती लोकसंख्या पाहता या शहरांची स्वच्छता ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर हे अभियान हाती घेण्यात असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच या अभियानात कार्यरत असणाऱ्या खासगी संस्थेने महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करून घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
टाटा कौशल्य विकास केंद्रामार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टाटा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून सात हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार असून त्यात रोबोटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजनस आणि ड्रोन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
टाटा कौशल्यवर्धन केंद्रातून रोजगार निर्मिती होणार – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
कल्याण शहरातील दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड संचलीत कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. कल्याण लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने १९७ कोटी रुपयांच्या निधीतून हे केंद्र उभे राहणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज, इतर उद्योग संघ, एमआयडीसी व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. यामाध्यमातून दरवर्षी अंदाजे ७००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.या ठिकाणी उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांना या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार. जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढविण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
लोकाभिमुख कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये केडीएमसी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचे धनादेश वाटप, कल्याण – टिटवाळा रिंग रोड मधील पात्र लाभार्थ्यांना, MUTP-3A कल्याण बदलापूर ३ री आणि ४थी रेल्वे मार्गिका बाधित प्रकल्पग्रस्तांना तसेच MUTP-3A कल्याण गुड्स यार्ड उपमध्य रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप करण्यात आले. तर टिटवाळा येथील सस्टेनेबेल उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण,खंबाळपाडा येथे अद्ययावत क्रिडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन आणि महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडळ ३ च्या दामिनी पथकाला १६ दुचाकी वाहन वाटप इत्यादी महत्वाच्या कार्यक्रम यावेळी पार पडले.
यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील, सुमित एल्कोप्लास्टचे सीईओ सुमित साळुंखे, अमित साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.