
कल्याण दि.१० ऑक्टोबर :
तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कल्याण पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या (एनडीपीएस) गांजा तस्करी प्रकरणात तब्बल १७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा तस्करीप्रकरणी मोक्कांतर्गत झालेली अशा प्रकारची ही पहिलीच कार्यवाही आहे. (Kalyan police slaps Mcoca Act on 17 accused in ganja smuggling case; First action under Thane Police Commissionerate)
खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ सह भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे २ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही पथकाकडून केला जात आहे.
या तपासादरम्यान आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ११५ किलो गांजा, गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या २ मोटारकार, १ बुलेट, १ ऑटो रिक्षा, १ ॲक्टीव्हा, १ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे, २ वॉकी-टॉकी संच चार्जरसह असा सुमारे ७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे २१ ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत एकाच गुन्हेगारकडून ६२ किलो गांजा, पिस्तुल- वॉकी-टॉकी संच जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणाच्या तपासात अजून ४ आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे की ही टोळी मागील तीन वर्षांपासून अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, तस्करी व पुरवठा करून अवैध मार्गाने मोठा आर्थिक फायदा मिळवत होती. आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहून कधी एकत्र तर कधी स्वतंत्रपणे विविध साथीदारांच्या मदतीने हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याची माहिती डी सी पी अतुल झेंडे यांनी दिली.
तसेच या टोळीचा गुफरान हन्नान शेख हा प्रमुख असून त्याच्यासह इतर १६ साथीदारांविरुद्ध मोक्कांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे यांसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात तरुणाईला अंमली पदार्थाच्या आहारी लावले. व्यसनाधीन झालेल्या तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत असून, ते गुन्हेगारीकडे वळत असल्याचे गंभीर वास्तव तपासातून समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने ३० जुलै २०२५ रोजी गॅझेट प्रसिद्ध करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यात (मोक्का) सुधारणा केली असून, त्यामध्ये अंमली पदार्थासंबंधी गुन्हेही समाविष्ट केले आहेत. त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती डी सी पी अतुल झेंडे यांनी दिली.