Home ठळक बातम्या आता कल्याणातच घडणार नेमबाज ; कल्याणातील अत्याधुनिक शूटिंग रेंजचे खा. डॉ. श्रीकांत...

आता कल्याणातच घडणार नेमबाज ; कल्याणातील अत्याधुनिक शूटिंग रेंजचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

एकाच ठिकाणी 3 शूटिंग रेंज असणारे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच केंद्र

कल्याण दि.15 डिसेंबर :
अचूकता, संयम, एकाग्रता आणि शिस्त शिकवणाऱ्या नेमबाजी खेळ शिकणाऱ्या कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील खेळाडूंसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहत परिसरात आधुनिक आणि सुसज्ज शूटिंग रेंज उभारण्यात आली असून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी त्याचे उद्घाटन संपन्न झाले. या शूटिंग रेंजमुळे कल्याणातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. (Kalyan to Become a Hub for Sharpshooters; MP Dr. Shrikant Shinde Inaugurates State-of-the-Art Shooting Range)

नेमबाजी या खेळाने भारताला ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदकं मिळवून दिली आहेत. आणि कल्याण डोंबिवलीतीलही अनेक होतकरू खेळाडू आज या क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये सरावासाठी या खेळाडूंना शूटिंग रेंज उपलब्ध नसल्याने ठाणे, मुंबई किंवा अंबरनाथ येथील शूटिंग रेंज गाठावी लागत होती. मात्र आता आपल्या शहरातच ही सुसज्ज सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि मेहनत वाचल्याने खेळाडू आपले कौशल्य अधिक प्रभावीपणे ते विकसित करू शकतील असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

खा. शिंदे यांनी साधला अचूक निशाणा…
या शूटिंग रेंजचे उद्घाटन झाल्यानंतर याठिकाणी असलेल्या 10 मीटर आणि 25 मीटर अंतराच्या दोन्ही रेंजवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रायफल तसेच पिस्टलद्वारे एकदम योग्य टार्गेट्सवर फायर करत नेमबाजी खेळातील आपले कौशल्य दाखवून दिले. या अचूक निशाण्याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या एका मिश्किल प्रश्नालाही त्यांनी त्याच शैलीत उत्तर दिले. “आमचा निशाणा बरोबरच असतो, आतापर्यंत सर्व निशाणे बरोबरच लागलेले आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीतही आमचा असाच अचूक निशाणा लागेल असे सांगताच सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची कळी फुलली.

याठिकाणी असलेल्या प्रशिक्षित मार्गदर्शक, सुरक्षित वातावरण आणि उत्तम दर्जाच्या सोयी-सुविधांमुळे येथून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवंत नेमबाज घडण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नगरसेवक संजय पाटील यांच्यासह केडीएमसी प्रशासनाचेही विशेष कौतुक केले.

असे आहे हे शूटिंग रेंज…
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडजवळील कोकण वसाहत याठिकाणी हे शूटिंग रेंज उभारण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने 95 लाख, आमदार विश्वनाथ भोईर यांनी 50 लाख आणि राज्य शासनाकडून 25 लाख असा 1 कोटी 70 लाख रुपये खर्च आला आहे. या केंद्रात पहिल्या हॉलमध्ये 25 मीटरचे एक तर दुसऱ्या सभागृहात प्रत्येकी 10 मीटरचे दोन अशा एकूण 3 शूटिंग रेंजचा समावेश आहे. तसेच 25 मीटर रेंजमध्ये 5 टार्गेटस तर 10 मीटर रेंजमध्ये 12 टार्गेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील, संजय पाटील, निलिमा पाटील, सुनील वायले यांच्यासह महापालिका सचिव किशोर शेळके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा