
कल्याण दि.17 डिसेंबर :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत असताना दुसरीकडे मनसेच्या माजी नगरसेवक पती पत्नीने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कल्याण पश्चिमेतील कौस्तुभ देसाई आणि कस्तुरी देसाई या पती पत्नीने ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेची साथ सोडली आहे. (Major Setback for MNS: Former Corporator Couple from Kalyan West Resign from Party Membership)
एकंदर राजकीय परिस्थिती, सध्याचे प्रभागातील चित्र पाहता आपण जनतेच्या हितासाठी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी कौस्तुभ देसाई यांनी दिली आहे. तर पक्ष नेतृत्वावर किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आपली कोणतीही नाराजी नसून मनसेमुळेच आपल्याला ओळख मिळाल्याची प्रांजळ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा की भाजपमध्ये याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ असेही कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई यांनी स्पष्ट केले.
दरम्यान डोंबिवलीपाठोपाठ कल्याण हा मनसेचा एकेकाळी मोठा बालेकिल्ला समजला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे मनसेला मोठी घरघर लागलेली दिसून येत आहे. त्यात आता जसजशी निवडणूक जवळ होईल तसे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे.


























