Home ठळक बातम्या सोलर सिटीच्या दिशेने पुढचे पाऊल; कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे लोकार्पण

सोलर सिटीच्या दिशेने पुढचे पाऊल; कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे लोकार्पण

लवकरच संपूर्ण केडीएमसी क्षेत्रात बसवणार सोलर हायमास्ट

कल्याण दि.16 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीला सोलर सिटीचा खिताब बनवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या क्षेत्रात आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. केडीएमसी विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे कल्याण पश्चिमेच्या गणपती चौकात लोकार्पण करण्यात आले. केडीएमसीचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या हस्ते आणि अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, फिलिप्स इंडिया कंपनीचे नॅशनल हेड श्रीकांत फणसे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने 7.5 लाख किमतीची ही हायमास्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Next step towards Solar City; Inauguration of the first state-of-the-art solar highmast in Kalyan Dombivali)

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फिलिप्स इंडियाकडून हा अत्याधुनिक सोलर हायमास्ट प्रायोगिक तत्त्वावर केडीएमसीला उपलब्ध करून देण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित किंवा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते. त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यावेळी मोठे आव्हान निर्माण होते. कारण अंधाराचा गैरफायदा घेऊन काही गैरकृत्य झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात बसवण्यात येणाऱ्या या सोलर हायमास्टमुळे या गैरकृत्यांना आळा बसण्यासह संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही असा विश्वास यावेळी विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत यांनी व्यक्त केला. तसेच नेहमीच्या सोलर हायमास्टपेक्षा या दिव्यांचा उजेडही अधिक जास्त असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

तर कल्याण पश्चिमेत बसवण्यात आलेल्या या हाय मास्टचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये ते बसवण्यात येणार आहेत. ज्यामुळे नागरिकांची सुरक्षिततेसोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे.

यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उपकार्यकारी अभियंता भागवत पाटील आणि फिलिप्स इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा