
ठाणे दि.16 ऑक्टोबर :
प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिशीं चर्चा करणे आणि योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील रहावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा ‘स्मार्ट शाळा’ करण्यासाठी १०० कोटी निधी आराखडा तयार करून कार्यवाही करण्याच्या सूचना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत. जिल्हा विकास समन्वय – सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिशा समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विविध योजनांचा आढावा घेत हे निर्देश दिले. (Prepare a fund plan of Rs 100 crore to make all schools in the district smart schools – Instructions to the district administration of Dr. Shrikant Eknath Shinde)
या बैठकीत पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U), स्वच्छ भारत मिशन (SBM), स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना, सर्व शिक्षा अभियान (SSA), मिड-डे मील स्कीम, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, आदर्श ग्राम योजना, जल जीवन मिशन याअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि संचालनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
इ-वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. मलंगगड, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठाणे जिल्हयातील इतर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे नमूद केले. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी ऍक्शन मोडवर कामकाज करण्यात यावे. यावेळी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चादेखील करण्यात आली.
२७ गावातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळा कल्याण डोंबिवली महापालिकेत समायोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या या शाळांना स्मार्ट करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२९ शाळा असुन प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व शाळा दुरुस्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १२ टक्क्यांनी पटसंख्या वाढ झाली आहे. तसेच दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर उंचावले आहे. ५७ कोटी ७५ लाख निधी उपलब्ध होता आणि त्याअंतर्गत शाळा दुरुस्ती करण्यात आली असून नाविन्य पुर्ण योजनेचा निधी आणि जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधीही शाळा दुरुस्ती तसेच स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भांतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय – सनियंत्रण समिती (दिशा) सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी उद्देश समोर ठेवून कामकाज करण्याबाबत प्रास्तिविकात सांगितले.
खासदार तथा सहअध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के यांनी दिशा समितीमार्फत जलद गतीने कामकाज पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पंतप्रधान आवास योजना शहरी भागात राबविण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के, खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा – सुरेश गोपीनाथ म्हात्रे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी किणीकर, विधानसभा सदस्य कुमार आयलानी, विधानसभा सदस्य राजेश मोरे, विधानसभा सदस्य सुलभा गणपत गायकवाड, नवीमुंबई महानगरपालिका डॉ. कैलास शिंदे, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक ठाणे (ग्रामीण) डॉ. डी. एस. स्वामी, आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अनमोल सागर, उप आयुक्त ठाणे महानगरपालिका संदिप माळवी, पोलिस उपायुक्त ठाणे शहर श्रीकांत पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.