Home ठळक बातम्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानग्या यंदा ॲपद्वारे ; डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे...

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परवानग्या यंदा ॲपद्वारे ; डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे केडीएमसी – पोलीस प्रशासनाचे आवाहन

 

कल्याण डोंबिवली दि.21 ऑगस्ट :
यावर्षीपासून गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन मिळणार असल्याचे सांगत डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी आणि पोलीस प्रशासनाकडून कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना करण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी – पोलिसांकडून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात आयोजित सार्वजनिक मंडळांच्या बैठकीत प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले. (Public Ganeshotsav permission through app this year; KDMC appeals to police administration to celebrate DJ-free and eco-friendly Ganeshotsav)

परवानग्या ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होतील…
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या महापालिका, पोलीस, महावितरण यांचेकडील परवानग्या ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होतील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांना दिली. यामुळे श्रीगणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी विविध कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास अडचण येत असल्यास प्रभाग स्तरावर महापालिकेतर्फे एक खिडकी योजनेची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. तर यावेळी महापालिका उपायुक्त समीर भूमकर यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्व परवानगींसाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल याबाबत गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. तर यावेळी गणेशोत्सव तोंडावर येऊनही शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करणार… 

गणेशोत्सवाच्या काळात मंडळे आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतच्या तक्रारी संकलित करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जन घाट आणि मिरवणुकीचे मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच जे रस्ते इतर प्राधिकरणाचे आहेत त्यांनाही याबाबत सूचना देण्यात असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. तर पर्यावरणाचा विचार करता नागरिकांनी, श्री गणेश मंडळांनी शक्यतो शाडूच्या मूर्तींचा वापर करावा, ६ फूटापेक्षा लहान मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा उपयोग करावा, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करा…

तर यावर्षीच्या श्री गणेशोत्सवातील मिरवणुका डीजेऐवजी पारंपरिक ढोल ताशांच्या माध्यमातून आयोजित करून ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन परिमंडळ- 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले. गणेशोत्सव काळातील डीजेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना बहिरेपणासह उद्भवणाऱ्या आरोग्यप्रश्नांवर प्रकाश टाकणारी एक ध्वनिफितही यावेळी पोलिसांकडून दाखवण्यात आली. त्यावर ढोल ताशा पथकांचे मानधन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आवाक्याबाहेर असल्याचे सार्वजनिक मंडळांकडून सांगण्यात आले.

शासनाच्या विविध प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित…

या बैठकीला अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, प्रांतअधिकारी विश्वास गुजर, विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, तहसीलदार सचिन शेजाळ, उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी, महावितरण, एमएमआरडीए प्राधिकरण अधिकारी यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील श्री गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा