
(प्रातिनिधिक छायाचित्र)
ठाणे, दि.28 सप्टेंबर :
भारतीय हवामान खात्याने (IMD) ठाणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला असून काल रात्रीपासूनच कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीसह जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. (Red alert for rain; Heavy rains have been reported in Kalyan Dombivali since night, administration appeals for vigilance)
अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने काल रात्रीपासून हजेरी लावली आहे. काल रात्री काही वेळ विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊसही पडला असून आज सकाळपर्यंत पावसाचा जोर दिसून येत आहे. तर हवामान विभागाच्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनही सज्ज असून शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती उपआयुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना..
राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, उपविभागीय अधिकारी (SDO), तहसिलदार, तसेच तलाठी, ग्रामसेवक, आणि पोलीस पाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी लष्कर (Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्याशी समन्वय साधून बचाव कार्यासाठी तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास,नागरिकांना सुरक्षित निवारा किंवा मदत शिबिरांमध्ये हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेषतः, समुद्रकिनाऱ्याजवळील गावांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि भरती-ओहोटीच्या वेळा तपासून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन…
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.
शासन आणि प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे तयार असून, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, गरज असल्यासच घराबाहेर पडावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा. या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.