Home ठळक बातम्या गंभीर नागरी समस्या, केडीएमसीच्या कामकाजाची कॅग (CAG) द्वारे चौकशी करा – कल्याणातील...

गंभीर नागरी समस्या, केडीएमसीच्या कामकाजाची कॅग (CAG) द्वारे चौकशी करा – कल्याणातील नागरिकाची थेट देशाच्या मुख्य न्यायाधीशांकडे मागणी

मुख्य न्यायाधिशांना पत्र पाठवून मांडली नागरिकांची व्यथा

कल्याण दि.23 ऑगस्ट :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील गंभीर नागरी समस्यांनी पिचलेल्या कल्याणातील एका जागरूक नागरिकाने थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले असून इथल्या नागरी समस्यांची कॅग CAG द्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. निशित शहा असे या नागरिकाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी पोस्टाद्वारे हे पत्र पाठवून केडीएमसीच्या कामकाजाची नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) कमिटीमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे. (Serious civic issue, CAG should investigate the functioning of KDMC – citizen of the kalyan demand directly to the Chief Justice of the india)

देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रामध्ये शहरातील दैनंदिन जीवन त्रस्त करणाऱ्या प्रमुख समस्या नमूद करण्यात आल्या आहेत. त्यात शहर नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, वाढती- अनियंत्रित वाहतूक कोंडी, सार्वजनिक आरोग्य, अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधा अशा प्रमुख नागरी समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच “आम्ही नियमित कर भरतो, प्रामाणिकपणे महसूल देतो; तरीदेखील चांगले रस्ते, योग्य आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आदी मूलभूत सुविधा आम्हाला मिळत नाहीत. हे आमच्या हक्कांवर अन्याय असल्याची,” उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी यावर व्यक्त केली आहे.

तर शहरात रोज सकाळ-संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी, पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात, रुग्णालयांची दुरावस्था आणि कोणत्याही नियोजनाशिवाय होणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे आमचे जगणे मुश्किल झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी आपण पोस्टाने हे पत्र पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा