
कल्याण दि.7 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीतून आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मतदानाला अवघा आठवडा उरला असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने थेट शिवसेनेच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खात्यामध्ये आणखी एक बिनविरोध उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानिमित्ताने केडीएमसी निवडणुकीतील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आणखी एक मास्टरस्ट्रोकची चर्चा रंगली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का समजला जात आहे. (Shiv Sena Candidate Likely to Be Elected Unopposed After Unconditional Support from Uddhav Thackeray Faction)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पॅनेल क्रमांक ३० (ड) मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रामचंद्र गणपत माने उर्फ भीमा हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ पॅनल क्र ३० च्या (ड) मधून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. त्यांनी आपला संपूर्ण पाठिंबा त्यांच्यासमोर निवडणूक लढणारे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन बाबू पाटील ह्यांना आणि पॅनल क्रमांक ३० मधील शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांच्या उपस्थितीत त्यांनी डोंबिवली निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आपल्या पाठींब्याचे पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे केडीएमसीतील शिवसेनेच्या खात्यात आणखी एका बिनविरोध उमेदवाराची भर पडल्याची चर्चा आहे.
तर रामचंद्र गणपत माने उर्फ भीमा यांनी केलेल्या शिवसेना पक्ष प्रवेशावेळी सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार राजेश मोरे, भाजपा जिल्हाप्रमुख नंदकिशोर परब, निवडणूक प्रचार प्रमुख नाना सूर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उमेदवार अर्जुन पाटील, सचिन पोटे, ओम लोके, सागर जेधे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पॅनल क्रमांक 30 मधील डॉ. मनोज बामा पाटील* ह्यांनी अर्जुन पाटील ह्यांना पाठिंबा दिला असून अर्जुन पाटील ह्यांच्या समोर एकही उमेदवार निवडणूक लढण्यास नसून जे दोघे होते त्यांनीही बिनशर्त पाठिंबा दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्या यशस्वी नेतृत्वात ही लढत शिवसेनेसाठी ह्या पॅनलमध्ये एकतर्फी झाल्याची चर्चा रंगली आहे.

























