
इतिहास, संस्कृती आणि कलाविष्कार यांचा सुरेख संगम
कल्याण दि.६ जानेवारी :
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाला कला आणि संगीताची भव्य जोड देणारा ‘शिवसंस्कार महोत्सव २०२६’ आजपासून (दि. ६ जानेवारी) कल्याणमध्ये उत्साहात सुरू झाला आहे. इतिहास, संस्कृती आणि कलाविष्कार यांचा सुरेख संगम असलेला हा महोत्सव शिवप्रेमी, कलारसिक तसेच प्रत्येक कुटुंबासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. (Shivaji Maharaj’s Legacy Comes Alive Again in Kalyan; Grand ‘Shiv Sanskar Mahotsav 2026’ Begins at K.C. Gandhi School)
कल्याण एकयुकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य कृष्णालाल धवन, संस्थेचे अध्यक्ष राजेश गांधी, सचिव मनोहर पालन, हेमंत जोशी, भास्कर शेट्टी, सुनील पाठारे, स्वप्नाली रानडे, पूरब गांधी, श्रीकांत शेट्टी, निखिल बुधकर आणि शिवसंस्कार महोत्सवाची संकल्पना साकारणारे सईशा फाउंडेशनचे अनिल नलावडे, पद्मश्री राव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
१५० चित्रकाव्यांचे भव्य प्रदर्शन…
महोत्सवाअंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘शिवस्वर’ चित्रकाव्य कलादालनात शिवचरित्रावर आधारित १५० चित्रकाव्यांचे भव्य प्रदर्शन रसिकांसाठी खुले करण्यात आले आहे. रंग, शब्द आणि भावनांच्या माध्यमातून शिवरायांचे जीवनकार्य उलगडून दाखवणारे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश…
हा महोत्सव दि. ६ ते १० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत मोफत प्रवेश देण्यात येत आहे. तर सामान्य नागरिकांसाठी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० या वेळेत फक्त ₹२० इतक्या नाममात्र शुल्कात प्रवेश उपलब्ध आहे.
संगीत शिवस्वराज्यगाथा’ या कार्यक्रमाने होणार समारोप…
महोत्सवाचा समारोप दि. १० जानेवारी रोजी सायं. ६.३० वाजता होणाऱ्या ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. ४३ नवगीतांमधून साकारलेले संगीतमय शिवचरित्र रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
हा भव्य महोत्सव श्रीमती के. सी. गांधी विद्यालय, कल्याण (प.) येथे सुरू असून, अधिक माहितीसाठी ९५९४४२१११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
























