Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कल्याण डोंबिवली दि.28 ऑगस्ट :
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासह ६ फुटा पेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यापूर्वीच केले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील गणेश घाटांवर उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन तलाव संकल्पनेला, दीड दिवसांच्या श्री गणेश विसर्जनाचे वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार हजारो गणेशभक्तांनी या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये बाप्पाचे आज विसर्जन करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिकेच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुकही केले. (Citizens’ spontaneous response to Kalyan Dombivali Municipal Corporation’s artificial immersion ponds)

यंदाच्या वर्षी अधिकाधिक व्यापक प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने चंग बांधला असून त्यादृष्टीने आवश्यक असलेली कार्यवाहीही केली आहे, कृत्रिम विसर्जन तलावाची संकल्पना ही त्यापैकीच एक असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम विसर्जन तलाव उभारणे हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. पारंपारिकपणे गणेश विसर्जनासाठी नद्या, तलाव आणि समुद्राचा वापर केला जातो, परंतु मूर्तीतील रंग, प्लास्टर, इत्यादींचे रासायनिक मिश्रण पाण्यात मिसळून निसर्गास हानी पोहोचते. यासाठी महापालिकेने दुर्गाडी गणेश घाट आणि मोठागाव गणेश घाट या प्रमुख ठिकाणी त्याचबरोबर महापालिकेच्या दहाही प्रभागात देखील कृत्रिम विसर्जन तलाव उभारले आहेत. इतकेच नव्हे तर प्रभाग निहाय विसर्जन स्थळे गुगल मॅपच्या माध्यमातून दाखवून जनजागृती केल्यामुळे स्थानिक नागरिकांना विसर्जनासाठी जाताना होणारी अडचण आणि ताण कमी झाला आहे.

गणेशोत्सवाचा प्रारंभ होण्याच्या आधी महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी नागरिकांना ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी हजारो गणेशभक्तांनी या कृत्रिम तलावात आपल्या बाप्पाचे विसर्जन करत पर्यावरण रक्षणात आपला सिंहाचा वाटा उचलल्याचे दिसून आले.

यासोबतच महापालिकेने विसर्जन तलावांच्या आजुबाजुच्या परिसरात निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली असल्याने भक्तांना त्यांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करताना निर्माल्य विसर्जित करण्याचीही चांगली सुविधा उपलब्ध झाली.

श्री गणेश विसर्जनासाठी नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आणि सकारात्मक आहे. पर्यावरणाची काळजी घेत अनेक गणेशभक्तांनी स्वतःच्या स्तरावर ही कृत्रिम तलावांच्या वापरास प्रोत्साहन दिले आहे. हे तलाव श्री गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी खूप सोयीचे ठरले आहेत, कारण यामुळे ना केवळ वेळेची बचत झाली, तर प्रदूषणही टळले आहे. यामुळे श्रीगणेश विसर्जनाचा पारंपारिक उत्सव आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधला जात असल्याबद्दल गणेशभक्तांनी महापालिकेचे मनापासून आभार मानले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलाव संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे की, प्रत्येक छोटा बदल देखील मोठ्या प्रमाणावर पर्यावरण रक्षणात मदत करू शकतो ,त्यासाठी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या शहराला स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा