Home ठळक बातम्या “थँक्यू प्राईम मिनिस्टर मोदीजी; ही राजकीय भेट नव्हे तर आयुष्यातील अविस्मरणीय क्षण”...

“थँक्यू प्राईम मिनिस्टर मोदीजी; ही राजकीय भेट नव्हे तर आयुष्यातील अविस्मरणीय क्षण” – एनडीए खासदारांच्या स्नेहभोजनाबाबत खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर झाले फोटो

नवी दिल्ली दि.12 डिसेंबर :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या खासदारांसाठी गुरुवारी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये शिवसेनेचे गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या दिड तासाच्या भेटीचे वर्णन करताना “थँक्यू प्राईम मिनिस्टर मोदीजी; ही राजकीय भेट नव्हे तर आयुष्यातील अविस्मरणीय क्षण” असल्याची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीसंदर्भात खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (“Thank You, Prime Minister Modi ji; This Was Not a Political Meeting but an Unforgettable Moment of My Life” — MP Dr. Shrikant Shinde on the NDA MPs’ Fellowship Dinner)

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या स्नेहभोजन कार्यक्रमाबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एनडीए खासदारांचे फोटो तसेच माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांच्यासह कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे. तर या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे भारावून गेल्याचे जाणवत असून पंतप्रधान मोदी यांचे विचार पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतील असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची पोस्ट जशीच्या तशी…

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आपले मनःपूर्वक आभार..!!
७, लोककल्याण मार्ग येथे आपल्यासोबतची दीड तासांची भेट माझ्यासाठी अत्यंत मोलाची ठरली. केवळ एक साधारण राजकीय भेट ठरू शकणारा तो क्षण, माझ्या आयुष्यात दीर्घकाळ स्मरणात राहील असा अविस्मरणीय क्षण ठरला आहे. सतत धावणाऱ्या आणि न थांबणाऱ्या या दिल्ली शहरातील ही भेट नक्कीच प्रेरणादायी ठरली.

दीर्घ सार्वजनिक जीवनातून आलेल्या आपल्या नेतृत्वाविषयीच्या विचारांनी मला नक्कीच प्रेरित केले आहे. “ध्येय स्पष्ट असेल, तर दडपण नाहीसे होते” आपले हे साधे पण अत्यंत प्रभावी विचार मला पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरले आहेत. शिस्त, उत्तम झोप, भावनिक संतुलन याविषयीचे आपले मार्गदर्शन अर्थपूर्ण होते. विशेषतः स्वतःच्या भावनांना कागदावर उतरवून त्यांना समजून घेणे, त्यांना मुक्त करणे आणि इतरांचे नेतृत्व करण्यापूर्वी स्वतःचे नेतृत्व साधणे ही दिलेली शिकवण कालातीत अशीच आहे.

७, लोककल्याण मार्गातून बाहेर पडताना माझ्या मनात नव्या स्पष्टतेची, स्थैर्याची आणि ध्येयदिशेची जाणीव निर्माण झाली. आगामी जबाबदाऱ्यांसाठी बळ देणारी. अर्थपूर्णच नव्हे, तर अंतर्मुख करणाऱ्या आणि मनाला परिवर्तन देणाऱ्या संवादासाठी पंतप्रधान महोदय आपले मनःपूर्वक आभार.

राष्ट्रनिर्मितीबद्दलची आपली अविचल निष्ठा आम्हा सर्वांना सातत्याने प्रेरित करत राहते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा