
नागपूर दि.12 डिसेंबर :
राज्यातील आगामी महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना भाजप – शिवसेनेमध्ये यासाठी युती होणार की नाही याकडे इच्छुक उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची काल रात्री बैठक झाली. त्यानंतर आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना महापालिका निवडणुका महायुतीमध्येच लढवण्यावर दोघांचेही एकमत झाल्याचे सांगितले. (Upcoming Municipal Elections to Be Fought Under the MahaYuti Alliance;Detailed Discussion Held Between Deputy Chief Minister Eknath Shinde and BJP State President Ravindra Chavan)
कडवटपणाची जागा घेतली मैत्रीपूर्ण संबंधांनी…
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या काळामध्ये झालेल्या पक्ष प्रवेशाच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमधील राजकीय संबंध चांगलेच ताणले गेले होते. ते पाहता राज्यातील महापालिका निवडणुका महायुतीतील हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढवणार असल्याचेच चित्र निर्माण झाले. मात्र गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांतील या कडवट संबंधांची जागा आता पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण भूमिकेने घेतल्याचे दिसत आहे. आणि या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमताने महायुतीचे सूर आळवल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निवडणूक महायुतीत लढवावी ही सर्वांची इच्छा…
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामध्ये काल रात्री मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली. ज्यामध्ये या सर्व महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून लढवाव्या अशी पक्षश्रेष्ठींसह सर्वांची इच्छा असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महायुतीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी…
तसेच महापालिका निवडणुका लढवण्यासाठी महायुतीचा फॉर्म्युला कसा असावा यासाठी महापालिका स्तरावर स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या समित्या स्थानिक राजकीय समीकरणांचा अभ्यास करून, महायुतीचा योग्य फॉर्म्युला कसा असावा, जागावाटपाची दिशा काय असावी आणि स्थानिक स्तरावरील समन्वय कसा मजबूत करावा, यावर सविस्तर विचार करून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल असे रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान एकीकडे महापालिका निवडणुका महायुतीमध्येच लढवण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांची वाटचाल सुरू केल्याने दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुक उमेदवार मात्र त्यामुळे हवालदिल झाले आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढवायची झाल्यास आपल्याला तिकीट मिळेल की नाही या विचाराने हे इच्छुक उमेदवार चिंतेत पडले आहेत.


























