
एकूण 122 जागा; 31 वॉर्डांतून प्रतिनिधी निवडले जाणार
कल्याण दि.22 ऑगस्ट :
आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांसाठीची प्रारूप वॉर्डरचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. या नव्या आराखड्यानुसार यंदाच्या निवडणुकीत एकूण 122 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार असून शहरात एकूण 31 वॉर्डांची निर्मिती करण्यात आली आहे. (2025 draft constitution announced for Kalyan-Dombivli Municipal Corporation elections)
केडीएमसीने जाहीर केलेल्या या प्रारूप रचनेनुसार, वॉर्ड क्रमांक 21 आणि 25 हे 3 सदस्यांचे पॅनल वॉर्ड म्हणून आहेत. तर उर्वरित 29 वॉर्ड हे 4 सदस्यांचे असणार आहेत. तर यासाठी 2011मधील जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे.
शहरातील लोकसंख्या वाढ, भौगोलिक विस्तार आणि मतदारसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन वॉर्डरचना करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे अनेक वॉर्डांचा चेहरा-मोहरा बदलणार असून, स्थानिक पातळीवर नवे राजकीय गणितही तयार होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या प्रारूप रचनेवर नागरिक, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांना आक्षेप आणि सूचना नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. त्या आक्षेपांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम वॉर्डरचना जाहीर केली जाईल.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची निवडणूक मानली जाते. त्यामुळे या प्रारूप रचनेनंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.