Home क्राइम वॉच कल्याण एपीएमसी मार्केटमधून 500 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त ; केडीएमसी-एमपीसीबी ची...

कल्याण एपीएमसी मार्केटमधून 500 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त ; केडीएमसी-एमपीसीबी ची कारवाई

कल्याण दि.10 जानेवारी :

कल्याण पश्चिमेतील एपीएमसी मार्केटमध्ये केलेल्या धडक कारवाईमध्ये तब्बल 500 किलो वजनाच्या सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. केडीएमसी आणि एमपीसीबी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली.(500 kg single use plastic seized from Kalyan APMC market; Action by KDMC-MPCB)

प्रदुषणात भर घालणा-या सिंगल युज प्लास्टिक विरोधात कडक कारवाईचे निर्देश केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले होते.
त्याअनुषंगाने गेल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांची बैठक घेत सिंगल युज प्लास्टिक विरोधी मोहिम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, क प्रभागाचे स्वच्छता अधिकारी संदिप किस्मतराव, स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ वड्डे आणि त्यांच्या पथकाने, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी आणि राजेश नांदगांवकर, राजेंद्र राजपुत, जयंत कदम यांचे समवेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमध्ये सुमारे 500 किलो प्लास्टिक जप्त करण्याची धडक कारवाई केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल मार्केटमधील रामनाथ गुप्ता दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे.

प्लास्टिकमुळे शहरातील पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे यापुढे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आढळल्यास महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. आणि ही मोहिम अधिकाधिक तीव्र केली जाणार असून, यापुढे नागरिकांनी, व्यापारी संघटनांनी सिंगल युज प्लास्टिक ऐवजी कागद वा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी केले आहे.

दरम्यान आजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांची बारावे प्लांट येथे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा