
टिटवाळा दि.31 मे :
टिटवाळा परिसरातील बल्याणी येथे केबीके शाळेची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. तर आणखी दोन लहान मुले जखमी झाली आहेत. शुकवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या भिंतीच्या दुरुस्तीबाबत स्थानिकांनी शाळा व्यवस्थापनाला वारंवार सूचना केल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. (One child died and two children were injured after a school wall collapsed in Balyani, Titwala; The incident took place on Friday afternoon)
काल दुपारच्या सुमारास या शाळेच्या भिंतीजवळ असलेल्या चाळीमध्ये काही मुलं खेळत होती. त्यावेळी अचानक शाळेची भिंत या मुलांवर कोसळली आणि त्याच्या ढिगाराखाली ३ मुलं अडकली. हा प्रकार पाहताच स्थानिकांनी धाव घेऊन भिंतीचा ढिगारा बाजूला करत या मुलांना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. अंश राजकुमार सिंह असं या मुलाचं नाव असून कु.अभिषेक सहानी, इ.२ री या मुलाला कल्याणमधील खासगी रुग्णालयात तर राजेश गुप्ता, इ.३ री याला फ्रॅक्चर आणि शस्त्रक्रियेची गरज असल्याने मुंबईतील सायन रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान या भिंतीच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांनी वारंवार शाळेकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यानंतरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने शाळा मालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
तर या दुर्घटनेची माहिती मिळताच उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन- संजय जाधव आणि अ प्रभागातील सहा. आयुक्त प्रमोद पाटील यांनी आणि त्यांच्या आपत्कालीन पथकाने तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन एकंदर परिस्थितीचा तात्काळ आढावा घेतला. तसेच शाळेची उर्वरित धोकादायक भिंत देखील उपअभियंता हरून इनामदार यांनी अग्निशमन विभाग आणि अ प्रभागाच्या पथकामार्फत तोडण्यात आली आहे. या दुर्घटनेबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अ प्रभागाचे सहा. आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.