
कल्याण दि.20 मे :
कल्याणकारांसाठी आजचा दिवस घातवार ठरला आहे. आज सकाळीच गांधारी पुलावर झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झालेला असतानाच कल्याण पूर्वेत इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.
कल्याण पूर्वेतील मंगल राघो नगर परिसरात आज दुपारी सप्तशृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून काही जण त्याखाली दबले गेल्याची घटना घडली. या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले याची माहिती मिळत नव्हती. तर या घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, सिव्हिल डिफेन्स, टी डी आर एफ यांच्यासह स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे आदी सर्वांच्या माध्यमातून एकत्रितपणे मदतकार्य सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
आतापर्यंत या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 12 लोकांना बाहेर काढण्यात यश आले असून अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आयुक्त गोयल यांनी दिली आहे. यामध्ये 12 पैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच केडीएमसीच्या धोकादायक इमारतीमधील ही इमारत नव्हती मात्र याठिकाणी अंतर्गत भागामध्ये स्लॅबच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यताही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली. यातील जखमी व्यक्तींवर कल्याण पूर्वेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान केडीएमसीने केलेल्या आवाहनानुसार कल्याण इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रत्येक प्रभागातील खासगी रुग्णालयांची यादी प्रशासनाला दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागात कमीत कमी 4 ते जास्तीत जास्त 8 रुग्णालयांचा समावेश असून त्याचाअंतर्गत कल्याण पूर्वेच्या या इमारत दुर्घटनेतील जखमी व्यक्तींवर कल्याण पूर्वेच्या विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कल्याण आय एम एच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली.