
कल्याण दि.4 मे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भाजपच्या कल्याणमधील तिन्ही मंडळांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपच्या कल्याण मध्य, जुने कल्याण आणि नवे कल्याण मंडळातर्फे कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. (Central government’s decision on caste-wise census: Celebrations from all three BJP mandals in Kalyan)
नविन कल्याण मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल काठे यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद नगरच्या योगीधाम चौकात जूने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रस यांच्या नेतृत्वाखाली पारनाका परिसरात आणि मध्य कल्याण मंडळाचे अध्यक्ष रितेश फडके यांच्या नेतृत्वाखाली बेतूरकर पाडा चौक येथे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ज्यामध्ये भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरुवातपासूनच “सबका साथ सबका विकास” ही भूमिका आहे. राजकारण करत असताना समाजातील दुर्लक्षित गरीब समाज, कष्टकरी समाज, कामगार समाज आणि वंचित समाजाचा विचार करण्यात आला आहे. या वंचित समाजामध्ये 12 बलुतेदार येतात, या बारा बलुतेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून मुघलांविरोधात लढा दिला. या बारा बलुतेदारांकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले होते, त्यामूळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनगणनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले. आपणही एका भटक्या समाजाशी निगडीत आहोत. या भटक्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा असण्याचे कारण म्हणजे या समाजाची लोकसंख्या किती आहे त्याची आतापर्यंत कधीच जनगणना झाली नाही. या दुर्लक्षित वंचित लोकांची, भटक्यांची आकडेवारी कोणालाही माहिती नसल्यानेच वारंवार या देशाच्या जातनिहाय जनगणनेची मागणी केली जायची. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये या जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. कारण त्यांचा फक्त एकाच समाजाच्या मतांवर डोळा होता आणि एका विशिष्ट समाजाचेच लांगुलचालन त्यांच्याकडून केले जायचे असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील वंचित समाज, दुर्लक्षित समाजाला पूर्णपणे न्याय मिळेल. त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार निधी उपलब्ध करून देता येईल जेणेकरून हा समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल असा विश्वास यावेळी नरेंद पवार यांनी व्यक्त केला.