
२४१ विजेचे खांब जमिनदोस्त; युद्धस्तरावर दुरुस्ती
कल्याण/वसई/पालघर दि.८ मे :
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेला बसला आहे. या वादळामुळे २४१ विजेचे खांब, ५ रोहित्र व १८ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त होऊन जवळपास ९२ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. (Mahavitaran’s Kalyan Circle suffers loss of Rs 92 lakh due to storm)
कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात एक खांब कोसळला असून चार ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याने वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चदाबाचे ४ खांब व लघुदाब वाहिनीचे ६५ खांब कोसळले व ४ किलोमीटर वीजतारा तसेच १ रोहित्र कोसळण्यासोबतच ४ रोहित्र नादुरुस्त झाले होते.
वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागात उच्चदाब वाहिनीचे १४ खांब व लघुदाब वाहिनीचे २७ खांब तसेच एक रोहित्र जमिनदोस्त होण्यासोबतच दोन रोहित्र नादुरुस्त झाले. पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, बोईसर भागात उच्चदाब वाहिनीचे ५४ तर लघुदाब वाहिनीचे तब्बल ७६ खांब पडले. उच्चदाबाच्या ९.५ किलोमीटर वीजवाहिन्या आणि लघुदाबाच्या ७.६ किलोमीटर वीजवाहिन्या कोसळल्या. एकूण तीन रोहित्र जमिनदोस्त होण्यासह ५ रोहित्र नादुरुस्त झाले आणि ४ उपकेंद्रामंधील वीज वितरण उपकरणांत बिघाड झाला.
मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंते, सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार फिल्डवर राहून अथक काम करीत होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले.