
येत्या रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार प्रकल्पाचे लोकार्पण
कल्याण डोंबिवली दि.16 मे :
कल्याण डोंबिवलीकरांना गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कचरा आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने “चेन्नई पॅटर्न” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच तर चेन्नईनंतर देशातील दुसराच उपक्रम असणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या रविवारी 18 मे रोजी वै.संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील भव्य मैदानावर या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण केले जाणार आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमाचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण केले जाणार आहे.
चेन्नईतही कचऱ्याच्या समस्येने नागरिक महापालिका प्रशासन झालेले हैराण…
चेन्नई केवळ भारतातील नव्हे तर जगातील लंडननंतरची सर्वात जुनी महानगरपालिका. कल्याण डोंबिवली शहरापेक्षा किती तरी पट अधिक क्षेत्रफळ आणि जवळपास तिप्पटीने लोकसंख्या असणारे मेट्रोपॉलिटन शहर. कल्याण डोंबिवलीप्रमाणेच कमी जागेमध्ये घनदाट लोकसंख्या असल्याने काही वर्षांपूर्वीपर्यंत इकडेही कचऱ्याच्या समस्येने नागरिक आणि महापालिका प्रशासन हैराण झाले होते.
आणि कचरामुक्त शहर संकल्पनेला चेन्नईकरांनी दिला मोठा प्रतिसाद…
मात्र साधारणपणे जानेवारी 2020 च्या म्हणजेच कोवीडच्या काळापासून चेन्नईने कचरा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी यशस्वीपणे राबवलेल्या अनोख्या “कचरामुक्त शहर” उपक्रमाचे देशभर कौतुक केले जात आहे. चेन्नई महानगरपालिकेने उरबेसर सुमीत या जागतिक कीर्तीप्राप्त संस्थेच्या माध्यमातून चेन्नई शहराचा कचरा आणि शहर स्वच्छतेमध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. विशेष म्हणजे चेन्नईतील नागरिकांनीही या अनोख्या उपक्रमाला तितक्याच सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्यानेच गेल्या चार वर्षांत या उपक्रमाने शहर स्वच्छतेमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
पहिल्या टप्प्यात या 7 प्रभागात राबविण्यात येणार चेन्नई पॅटर्न…
आणि आता हाच शहर स्वच्छतेचा चेन्नई पॅटर्न आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये राबवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या 7 प्रभागांची (डी, इ, एफ, जी, एच ,आय, जे वॉर्ड) निवड करण्यात आली आहे. या सातही प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट या संस्थेच्या माध्यमातून “कचरामुक्त शहर” उपक्रम राबविण्यासाठी कचरा संकलन वाहतूक आणि रस्तेसफाईचे अतिशय सूक्ष्म पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.
45 नॉर्मस् च्या अटी आणि की (Key)परफॉर्मन्स इंडिकेटर ठरणार निर्णायक…
त्यातही यापूर्वी किती कचरा उचलला जायचा त्याच्या वजनावर संबधित संस्थेला देयक दिले जायचे. मात्र या नविन संकल्पनेनुसार केडीएमसी प्रशासनाकडून यासाठी तब्बल 45 नॉर्मस्(निकष) बनवण्यात आले आहेत. हे सर्व नॉर्मस आणि ‘की (key)परफॉर्मन्स इंडिकेटर’ तपासूनच या कामाचे देयक दिले जाणार आहे आणि त्यांची पूर्तता न झाल्यास संस्थेवर दंडात्मक कारवाईची तरतूदही महापालिकेकडून करण्यात आली आहे. हा या उपक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग (USP) असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कचरा संकलन, वाहतूक आणि रस्तेसफाईवर विशेष भर…
कचरा संकलन, वाहतूक आणि रस्तेसफाई या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर या कचरामुक्त शहराच्या संकल्पनेमध्ये अधिक भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्याला तंत्रज्ञानाची उत्तम साथ अशी सांगड घालण्यात आली आहे. दिवसातील 24 तास 3 शिफ्टमध्ये हे काम चालणार असून प्रत्येक घराबाहेरील कचरा उचलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही तर यासोबतच शहरातील मुख्य असो की अंतर्गत रस्त्यांच्या परिणामकारक स्वच्छतेसाठी कुशल मनुष्यबळासोबतच पॉवर स्वीपर मशीनचाही समावेश असणार आहे. नागरिकांच्या कचऱ्या संदर्भातील तक्रारींसाठी विशेष ॲप बनवण्यात येणार असून या ॲपसोबतच सोशल मीडिया किंवा फोनद्वारे येणाऱ्या तक्रारी विनाविलंब सोडवण्यासाठी आय सीसीसी (Integrated Command and Control Centre) चीही निर्मिती करण्यात आली आहे.
चेन्नईप्रमाणेच कल्याण डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याचा विश्वास…
दरम्यान चेन्नईच्या धर्तीवर सुरू होणाऱ्या या महाराष्ट्रातील पहिल्या “कचरामुक्त शहर” उपक्रमालाही चेन्नईप्रमाणे कल्याण डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला आहे.